पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील घरकुल वसाहतीमध्ये पाच ते सात वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात दोन बसेसचा समावेश आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी या परिसरात दोन गटात वाद झाला होता. या वादातून रात्री वाहनांची तोडफोड करण्यात आली असून यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. तेव्हा हा वाद मिटला. मात्र, काल रात्री याच वादातून ७ ते ८ तरुणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या तोडफोडीत दोन बस, आणि छोट्या चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तोडफोड प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.