नऊ आरोपींना अटक; पाच अल्पवयीन आरोपी ताब्यात
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची तोडफोड करण्याचे व त्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचे सत्र कायम असल्याचे पुन्हा दिसून आले. चिखलीत दोन गटांच्या वादातून सहा मोटारी व काही दुचाकी फोडण्यात आल्या. या प्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
आठ दिवसांपूर्वी दोन गटात वाद झाला होता, ते प्रकरण पुढे वाढले. त्यातून ही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येते. चिखलीतील त्रिवेणीनगर भागात १४ जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. निगडी पोलिसांनी या प्रकरणी युवराज धोंडीबा मावळे (वय २०, म्हेत्रे वस्ती, चिखली), यशपाल गौतम सरवदे (वय २०, त्रिवेणीनगर, चिखली), राकेश बळीराम कांबळे (वय २१, ताम्हाणे वस्ती, चिखली), आकाश प्रकाश भालेराव (वय १९, ताम्हाणे वस्ती, चिखली), दीपरत्न दिलीप लोखंडे (वय १९, ओटा स्कीम, निगडी), लखन मच्छींद्र तुपे (वय २२, ओटा स्कीम, निगडी), पुरुषोत्तम गुरुप्रसाद शिवशरण (वय १९, ओटा स्कीम, निगडी), सुमीत सोमनाथ ससाणे (वय २१, ओटास्कीम निगडी), सागर लक्ष्मण मनेरे (वय १९, ओटास्कीम, निगडी) या आरोपींना अटक केली आहे. तर, पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोरे पुढील तपास करत आहेत.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळीचे सत्र सुरू आहे. वेगवेगळ्या भागात त्याच पद्धतीच्या घटना होत आहेत. अशा घटनांमधील बहुतांश आरोपी अल्पवयीन असल्याचे आढळून आले आहे.