एकेकाळी माजी मंत्री नारायण राणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कॉंग्रेसचे माजी आमदार विनायक निम्हण यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांची शिवसेनेच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पुणे शहरात शिवसेनेच्या वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया निम्हण यांनी शिवसेना प्रवेशानंतर दिली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी निम्हण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, त्यांनी कॉंग्रेसकडूनच पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार विजय काळे यांनी त्यांचा पराभव केला. शिवाजीनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी तेथील कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱयांनी निम्हण यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात निम्हण हे त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले होते. चव्हाण यांच्या मध्यस्थीमुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली नव्हती आणि ते कॉंग्रेसकडूनच विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती.