विनोद तावडे यांचे प्रतिपादन

महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत, त्या टिकवल्या पाहिजेत, त्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत, असे मत राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी भोसरीत व्यक्त केले. अहिराणी भाषेला सुगीचे दिवस येतील. या भाषेच्या विकासासाठी स्वतंत्र आराखडा बनवू, असेही ते म्हणाले.

पिंपरी महापालिका आणि खान्देश अहिराणी कस्तुरी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या राज्यस्तरीय एकदिवसीय अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष वि. दा. पिंगळे, महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नगरसेवक नामदेव ढाके, निमंत्रक विजया मानमोडे आदी यावेळी उपस्थित होते.

अहिराणी भाषेतच भाषणाचा प्रारंभ करत तावडे म्हणाले की, अहिराणी भाषेत मोठय़ा प्रमाणात साहित्य आहे. केवळ चार जिल्ह्य़ापुरती ही भाषा मर्यादित नाही. त्याची व्याप्ती भारतभर आहे. अहिराणी भाषेतील काही शब्द इतर भाषेतही आहेत. तिला अभ्यासाच्या भाषेत आणण्याचा प्रयत्न करू. कोणी संशोधन करत असल्यास त्यास शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहित करू. अनेक बोलीभाषा आहेत, त्या टिकवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अहिराणी भाषेत गोडवा आहे. इतका की या भाषेतील शिव्याही गोड वाटतात. पुढच्या पिढीने ही भाषा आत्मसात केली पाहिजे, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. प्रास्ताविक नगरसेवक नामदेव ढाके यांनी केले.