शंभर कुटुंबीयांना वर्षभर धान्यपुरवठा
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांना मदत करण्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेतला आहे. सदाशिव पेठेतील विश्रामबाग मित्र मंडळ ट्रस्टतर्फे अमरावतीतील दुष्काळग्रस्त भागातील शंभर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना वर्षभर धान्य पुरविण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते बुधवारी (२५ मे) भागवत हॉल, रमेश डाईंगशेजारील भागवत हॉल येथे केली जाणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष नितीन कोतवाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, तसेच मंडळाचे उपाध्यक्ष संतोष जगताप, कार्याध्यक्ष रिवद्र जाधव, राजेश मांढरे, संजय जगताप आदींची प्रमुख उपस्थिती असेल. अमरावतीतील चांदूरबाजार, वरुड, अंजनगाव, तिवसा, मोर्शी, दर्यापूर, भातुकली, अचलपूर आदी जिल्ह्य़ांमधील कुटुंबापर्यंत मदत पोहोचविण्यात येणार आहे. या कुटुंबांचे वर्षभरासाठी पालकत्व या गणेशोत्सव मंडळाकडून घेण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आपल्याला धान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. अशावेळी त्यांना मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे. यासाठी मंडळातर्फे वर्षभरातील कार्यक्रमांची संख्या कमी करुन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे पालकत्व घेण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याला गहू, तांदूळ, ज्वारी, कडधान्ये आदी अठरा वस्तूंचा शिधा शंभर कुटुंबांना देण्यात येणार आहे.
नितीन कोतवाल, अध्यक्ष, विश्रामबाग मंडळ