स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून विश्व साहित्य संमेलन ऑक्टोबरमध्ये अंदमानला घेण्यावर गुरुवारी साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनासाठी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्याऐवजी नवीन अध्यक्ष महामंडळाकडून नियुक्त केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
केवळ मराठी प्रांतापुरता विचार न करता जगभरातील मराठी माणसांचा स्नेहमेळावा, या उद्देशातून विश्व साहित्य संमेलन ही संकल्पना आकाराला आली. अमेरिकेतील सॅनहोजे, दुबई आणि सिंगापूर अशी तीन संमेलने झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला विश्व साहित्य संमेलन घेण्यामध्ये अपयश आले. त्यानंतर टोरँटो येथे निश्चित झालेले संमेलन संयोजकांना आर्थिक निधी संकलित न करता आल्यामुळे रद्द झाले. तर, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ठरलेले संमेलन साहित्य महामंडळाने आधी सरकारकडून निधी मिळवून दिला तरच होईल, अशी अट संयोजकांनी घातल्यामुळे रद्दबातल झाले.
साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले असून परिषदेचे प्रमुख पदाधिकारी हेच महामंडळाचे पदाधिकारी झाले आहेत. महामंडळ पदाधिकाऱ्यांची मुदत मार्चमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात विश्व साहित्य संमेलन घेण्यासाठीचा चंग बांधला आहे. अंदमान येथे विश्व साहित्य संमेलन घेण्यासाठी शिवसंघ प्रतिष्ठान आणि ‘ऑफबीट’ ही प्रवासी संस्था अशी दोन निमंत्रणे आली आहेत. या संमेलनासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचे अर्थसाह्य़ मिळाले नाही तरी संमेलन यशस्वी करून दाखवू, असा विश्वास या दोन्ही संयोजकांनी व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर अंदमानमध्ये संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.