हृदयाचे ठोके कमी झाल्यामुळे किंवा फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे हृदयावर ताण येऊन धाप लागणे वेळीच ओळखणाऱ्या आणि रुग्णाला मोबाईलचा गजर वाजल्याप्रमाणे धोक्याचा संदेश देणाऱ्या अद्ययावत पेसमेकरचे यशस्वी रोपण शस्त्रक्रिये दरम्यान पुण्यात पहिल्यांदाच करण्यात आले आहे.
या पेसमेकरला ‘व्हिवा कार्डिअॅक रीसिंक्रोनायझेशन थेरपी’ असे नाव असून रुबी हॉल रुग्णालयातील कार्डिअॅक कॅथलॅबचे संचालक डॉ. शिरीष हिरेमठ यांनी हा पेसमेकर वापरून शस्त्रक्रिया केली आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान देशात प्रथमच वापरले गेल्याचा दावा डॉ. हिरेमठ यांनी केला. ‘अशा प्रकारच्या पेसमेकरचे आयुष्य सध्या वापरात असलेल्या पेसमेकरपेक्षा सुमारे २ वर्षांनी अधिक असते. तर त्याची किंमत सुमारे साडेचार लाखांच्या आसपास असते,’ असेही ते म्हणाले.
 
पेसमेकरमधील तंत्रज्ञानात नवीन काय?
– हृदयाच्या दोन्ही कप्प्यांना बारीकसा धक्का देणे हे आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या पेसमेकरचे काम होते. नवीन तंत्रज्ञान वापरलेला पेसमेकर दोन्ही कप्प्यांना धक्का न देता हृदयाचा नैसर्गिक ठोका अचूक ओळखून हृदयाच्या हव्या त्याच कप्प्याला योग्य वेळी धक्का देतो.
– यामुळे पेसमेकरसाठी वापरली जाणारी बॅटरी वाचते.
– हा पेसमेकर हृदयाच्या पूर्णत: आतमध्ये असतो. रुग्णाच्या हृदयाचे ठोके कमी झाले किंवा फुफ्फुसांमध्ये पाणी होऊन दम लागू लागला की ती धोक्याची घंटा असल्याचे सुचवणारा संदेश पेसमेकर रुग्णाला ऐकवतो. हा संदेश मोबाईलचा गजर वाजवल्यासारखा असून तो ठराविक काळाने पुन:पुन्हा वाजत राहतो.
– हा पेसमेकर हृदयाच्या ठोक्यांमधील चढउतारांची माहिती सतत नोंदवून ठेवत असतो. ही माहिती पुढे डॉक्टरांना उपयुक्त पडू शकते.
– हा पेसमेकर जरी हृदयाच्या आत बसवलेला असला तरी तो शरीराच्या वरून एका ‘मॉनिटरिंग’ उपकरणाने नियंत्रित करता येतो.