मतदारयादीत नावच नसल्याने मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित रहावे लागलेल्या पुणेकर मतदारांच्या समर्थनार्थ आता अनेक संस्था आणि संघटना पुढे आल्या असून या नागरिकांना मतदानाची संधी द्यावी किंवा मग पुण्यात सरसकट फेरमतदानच घ्यावे अशी आग्रही मागणी होऊ लागली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी चर्चेची तयारी दाखवल्याने महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी शुक्रवारी उपोषण मागे घेतले.
वंचित मतदारांनी शुक्रवारी ओळखपत्रांच्या प्रतींसह तक्रारींचे निवेदन संबंधित कर्मचाऱ्यांकडे दिले. जिल्हाधिकारी कार्यालय पुरेशा गांभीर्याने कारवाई करीत नाही, याकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यासह अनेकांनी फेरमतदानाचा आग्रह धरला.

मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांचे ‘चलो दिल्ली’
राज्यात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पुण्यातील अनेक नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे. त्यासाठी फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी घेऊन हे मतदार दिल्लीत दाखल झाले आहेत. पुण्यातील महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली हे मतदार दिल्लीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांपुढे आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. दरम्यान, याबद्दल प्रतिक्रिया देताना आघाडीचे पुण्यातील उमेदवार विश्वजित कदम यांनी याप्रकाराचे राजकारण करू नये असे सांगितले आहे. मतदानापूर्वी सर्वच राजकीय पक्षांना मतदार याद्यांची तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ होता, त्यामुळे आता मतदान याद्यांतील घोळाबद्दल विरोधी पक्षांकडून केले जाणारे राजकारण अयोग्य असल्याची टीका विश्वजित कदम यांनी केली.