रतन टाटा यांच्याकडे सूत्रे आल्याने कामगारांच्या आशा पल्लवित

टाटा उद्योगसमूहाने सायरस मिस्त्री यांना कंपनीच्या अध्यक्षपदावरून दूर सारले आणि अध्यक्षपदाची हंगामी धुरा रतन टाटा यांच्याकडे सोपवल्यामुळे ‘टाटा मोटर्स’च्या पिंपरी-चिंचवड प्रकल्पात १४ महिन्यांपासून सुरू असलेला व्यवस्थापन आणि कामगारांमधील तिढा सुटेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. रतन टाटा यांच्या काळात कामगार-व्यवस्थापन संघर्ष होत नसल्याचे सांगत त्यांच्यामुळे  न्याय मिळेल, असा आशावाद कामगारांकडून व्यक्त होत आहे.

टाटा मोटर कामगार-कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढ करारावरून १४ महिन्यांपासून तिढा आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी कित्येक दिवस कंपनीचा नाश्ता व जेवणावर बहिष्कार टाकला होता. जेवणाच्या सुट्टीत मूक मोर्चा काढून कामगार आपली नाराजी व्यक्त करत आहेत. कामगार नेत्यांचे शिष्टमंडळ कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांना भेटले. त्याचप्रमाणे, ज्येष्ठ खासदार शरद पवार यांनाही कामगार नेत्यांनी साकडे घातले होते. पवारांनी सायरस मिस्त्री यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चाही केली होती. या सर्व प्रयत्नानंतरही कंपनीतील तिढा मात्र सुटू शकलेला नाही. व्यवस्थापन आडमुठेपणाने वागत असल्याचे आणि कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगार नेत्यांनी वेळोवेळी केला. व्यवस्थापन मात्र आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सातत्याने सांगत आहेत.

व्यवस्थापन व कामगार नेत्यांचा समावेश असलेल्या वाटाघाटी समितीच्या बैठकीतही समाधानकारक तोडगा निघत नसल्याने वेतनवाढीचा विषय ‘जैसे थे’ आहे. या पाश्र्वभूमीवर, कंपनीतील नेतृत्वबदलामुळे कामगारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रतन टाटा यांना कामगारांचे प्रश्न चांगल्या प्रकारे माहीत आहेत. त्यांची कार्यपद्धती कायम कामगारांच्या हिताची राहिल्याचे सांगत या प्रकरणी ते निश्चितपणे योग्य तोडगा काढतील, असा विश्वास टाटा मोटर्स कामगार वर्तुळात व्यक्त होत आहे.