लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे परिणाम आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकारणातही जाणवू लागले आहेत. या महापालिकेच्या सहा प्रभागांच्या अध्यक्षपदाची शुक्रवारी (२५ एप्रिल) निवडणूक होत असून, त्यासाठी केवळ चारच अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढे पेचप्रसंग उभा राहिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सोयीसाठी पूर्वी चार प्रभाग अस्तित्वात होते. मात्र, महापालिकेच्या वाढत्या विस्तारामुळे चार ऐवजी सहा प्रभाग कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. त्यांना पुणे महापालिकेप्रमाणे क्षेत्रीय कार्यालये म्हणण्यात येणार आहे. त्यांच्यावर सहा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांची निवडणूक येत्या शुक्रवारी होत आहे. त्यासाठी महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वपक्षाच्या तसेच सहयोगी असलेल्या इच्छुक नगरसेवकांकडून अर्ज मागविले होते. त्यासाठी सोमवापर्यंतची (२१ एप्रिल) मुदत होती. या मुदतीत शकुंतला धराडे, शेखर ओव्हाळ, जावेद शेख या तिघांचेच अर्ज आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला मुदतवाढ दिली. ही मुदत बुधवारी सायंकाळी संपली. या मुदतीत केवळ छाया साबळे यांचा अर्ज आला. त्यामुळे सहा प्रभाग अध्यक्षपदांसाठी अवघे चार अर्ज अशी स्थिती आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मावळ मतदारसंघात मोठय़ा राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी पक्षाची उमेदवारी नाकारली आणि शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी, नगरसेवकांनी आमदार जगताप यांचा प्रचार केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देऊनही या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जुमानले नाही. आता अजित पवार यांच्याकडे कोणत्या तोंडाने पद मागणार, यामुळे अनेकांनी प्रभाग अध्यक्ष पदांपासून दूर राहणेच पसंत केले आहे. राष्ट्रवादीमधील या कलहाचा फायदा घेण्यासाठी विरोधक पुढे सरसावले आहेत. त्यामुळे प्रभाग अध्यक्षपदाची निवडणूक या वेळी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.