ओल्या कचऱ्यावर चारचाकी व्हॅनमध्ये अगदी कमी वेळात प्राथमिक प्रक्रिया करून त्यापुढची प्रक्रिया वेगळ्या जागेत करणारी एक खासगी कचरा व्यवस्थापन सेवा पुण्यात सुरू झाली आहे. आधी कचऱ्यावर प्राथमिक प्रक्रिया झालेली असल्यामुळे त्यावर पुढची विघटनाची प्रक्रिया करताना कचऱ्याला दरुगध येत नाही.
‘मोबीट्रॅश’ असे या कचरा व्यवस्थापन सेवेचे नाव असून त्याच्या दोन कचरा प्रक्रिया व्हॅन्सचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. कंपनीचे संचालक रवी श्रॉफ या वेळी उपस्थित होते.
ऑक्टोबर २०१५ पासून ही सेवा कंपनीतर्फे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून त्यात दहा ते बारा सोसायटय़ांना मोफत प्रायोगिक सेवा पुरवली गेली, तर सध्या ३ सोसायटय़ा व एका व्यावसायिक आस्थापनेकडून सशुल्क सेवा वापरली जाते, अशी माहिती ‘मोबीट्रॅश’चे टीम सदस्य सौरभ शहा यांनी दिली. ते म्हणाले, ‘सध्या सशुल्क सेवा वापरत असलेल्या ग्राहकांकडून प्रतिदिवशी २० किलो ते १५० किलो ओला कचरा तयार होतो. यात कचरा विभाजनानंतरचा ओला कचरा – प्रामुख्याने स्वयंपाकघरातील कचरा व पाने, डहाळ्यांसारख्या बागेतील कचऱ्याचा समावेश आहे. कचऱ्याच्या विघटनासाठी आम्ही जैवयांत्रिक प्रक्रिया करणारी यंत्रणा वापरतो. व्हॅनमध्ये १५ ते ४५ मिनिटांत कचऱ्यावरची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण होते व कच्चे जैविक खत तयार होते. त्यावर पुढच्या यंत्रणेत दहा दिवसांची प्रक्रिया करून खतनिर्मिती होते. यातील सोसायटय़ांना आवश्यक तेवढे खत त्यांना सेवेअंतर्गत दिले जाते.’
‘अनेक सोसायटय़ा कचरा विघटनाची मशीन्स बसवण्यासाठी तयार असतात परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी जागा व मनुष्यबळ नसते, तसेच मोठय़ा प्रमाणावर बनलेल्या खताचे काय करायचे हाही प्रश्न असतो. अशांसाठी या प्रकारची सेवा सोईची ठरू शकेल,’ असे शहा यांनी सांगितले.