धरणसाखळीतील पाण्याचा ओघ मंदावला

पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील धरणांमध्ये पाण्याचा ओघ मंदावला असून, आठवडय़ापासून धरणांच्या पाणीसाठय़ात फारशी वाढ झालेली नाही. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊन न झाल्यास पुणेकरांची सध्याची पाणीकपात लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे दहा महिन्यांपासून पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खडकवासला धरणसाखळीतील वरसगाव, टेमघर, पानशेत, खडकवासला या चार धरणांमध्ये जून अखेपर्यंत धरणांमध्ये केवळ दीड टीएमसी (अब्ज घनफूट) उपयुक्त पाणीसाठा होता. सध्याची पाणीकपात धरून पुण्याला महिन्याला सुमारे एक टीएमसी पाणी लागते. जूनअखेरीस केवळ एक महिन्याचाच पाणीसाठा असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती.

मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात चांगला पाऊस झाल्याने चित्र पालटून गेले. दरदिवशी धरण साठय़ामध्ये एक टीएमसीहून अधिक पाणी जमा होऊ लागल्याने पुणेकरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते. धरणात पाणीसाठा वाढत असताना पाणीकपात रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, धरणे पुरेशी भरत नाहीत तोवर पाणीकपात रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत चारही धरणांमध्ये साडेसोळा टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने ओढ दिली आहे.

मागील आठवडाभरात एकही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याचा ओघ चांगलाच मंदावला आहे. एका आठवडय़ापासून पाणीसाठा त्याच स्थितीत आहे. खडकवासला वगळता इतर तीन धरणे पुरेशा क्षमतेने भरलेली नाहीत. टेमघर धरण ४५ टक्के, वरसगाव ५३.७७ टक्के, तर पानशेत धरण ६३ टक्के भरले आहे. २९ जुलैला चारही धरणांमध्ये मिळून १६.७९ टक्के पाणीसाठा होता. पुण्यामध्ये सप्टेंबर २०१५ पासून पाणीकपात करण्यात येत आहे. पाणीकपात रद्द केल्यास पुण्याला महिन्याला दीड टीएमसी पाणी लागणार आहे. शेतीसाठी द्यावे लागणारे पाणी, बाष्पीभवन आदींचा विचार केल्यास सध्याचे पाणी वर्षभर पुरणारे नाही. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात वर्षभर पुरेल इतकी वाढ होण्यासाठी पाणलोट क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा करण्यात येत आहे.

मागील सहा दिवसांतील पाणीसाठा

  • २४ जुलै- १६.०७ टीएमसी
  • २५ जुलै- १६.७७ टीएमसी
  • २६ जुलै- १६.८५ टीएमसी
  • २७ जुलै- १६.७६ टीएमसी
  • २८ जुलै- १६.७८ टीएमसी
  • २९ जुलै- १६.७९ टीएमसी