गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पुण्यातील पाणीकपात अंशतः मागे घेण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. पावसाने ओढ दिल्यामुळे पुणे शहराला १४ जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. शुक्रवारपासून पुणेकरांना दिवसातून एकवेळा पाणीपुरवठा करण्यात येईल. महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत ८.६९ टीएमसी इतका पाणीसाठा झाल आहे. हा साठा २९.८० टक्के इतका आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्याचबरोबर खडकवासला धरण १०० टक्के भरण्यासाठी ०.५० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. हे धरण भरत आल्यामुळे कालव्यातून पाणी सोडावे लागणार आहे. ते पाणीही महापालिका उचलू शकते. या सर्व मुद्द्यांचा विचार करून पाणीकपात अंशतः मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.