परदेशात आपल्या राष्ट्राबाबत, राष्ट्राच्या इतिहासाबाबत तेथील नागरिक जागरुक आहेत, मात्र तसे चित्र भारतात दिसत नाही, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शनिवारी व्यक्त केली.
समर्थ पुणे परिवारातर्फे पुरंदरे यांच्या हस्ते इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना पहिला ‘समर्थ पुणे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला; त्या वेळी ते बोलत होते. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, खासदार अनिल शिरोळे, समर्थ परिवाराचे सुनील शितोळे, जगन्नाथ लडकत या वेळी उपस्थित होते. अकरा हजार रुपये, पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरंदरे म्हणाले,‘‘अभ्यासाकरिता लंडन येथे असताना एक पत्र पाठवायचे होते. पत्राला तिकीट चिकटवताना गडबडीत उलटे लागले. ते तिकीट ब्रिटनच्या राणीचे होते व उलटे लागल्याने राणीचे डोके खाली झाले होते. त्या वेळी तेथे काम करणाऱ्या महाविद्यालयीन मुलीने मला ते तिकीट सरळ चिकटवावे असे सांगितले. फ्रान्समधील एका संग्रहालयात ७०० वर्षांपूर्वी झालेल्या विजयी लढाईचे प्रतीक म्हणून एक तुटकी तलवार जतन करून ठेवली आहे. मात्र, आपल्याकडे याबाबतीत जागरुकता कमीच आहे. इतिहास मांडताना काही चुका होऊ शकतात. मात्र, त्यांचा बाऊ न करता योग्य अभ्यासानिशी त्या चुका दुरुस्त करायला हव्यात. मतभेद असायला हवेत, परंतु ते समजुतीने घ्यायला हवेत आणि सातत्याने कार्यरत रहायला हवे. इतिहासाची कुचेष्टा करता कामा नये.’’
बलकवडे म्हणाले,‘‘ शिवरायांनी आधी स्वतमध्ये आदर्श व्यक्तिमत्त्व घडविले, मग आदर्श समाज निर्माण केला. शिवरायांनी जे हिंदूवी स्वराज्य निर्माण केले, ते आपल्याला स्वातंत्र्याच्या ७० वर्षांत निर्माण करणे जमले नाही. पेशवे दफ्तरात पाच कोटी ऐतिहासिक कागद उपलब्ध आहेत, त्यातील केवळ लाख-दोन लाख कागदांवर अभ्यास झाला आहे. सध्या जात, प्रांताच्या चष्म्यातून इतिहास पाहिला जात आहे. ही उणीव दूर करीत निखळ अभ्यास करणारे इतिहास संशोधक निर्माण झाले पाहिजेत.’’ बाबासाहेबांची परंपरा बलकवडे पुढे नेत असल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. शिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.