चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या तीन तरुणांनी न्यायालयात पोलीसांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली. न्यायालयाने या आरोपांची दखल घेत या तिन्ही आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
पुणे जिल्ह्यातील दौंड पोलीसांनी एका ट्रक चालकाला लुटणाऱया तीन तरुणांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना बारामती पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. या तिघांनीही बारामतीमध्येही काही ठिकाणी चोरी केल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. शनिवारी त्यांना बारामतीतील कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी त्यांना पोलीस कारवाईबद्दल त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. सुरुवातीला ते काहीही सांगण्यास तयार नव्हते. मात्र, थोड्यावेळाने त्यांनी पोलीसांवरच लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. पोलीस कोठडीमध्ये आपले कपडे काढण्यात आले. त्याचबरोबर आमच्यापैकी दोघांचे कपडे काढून परस्परांसोबत लैंगिक संबंध ठेवण्याचे पोलीसांनी सांगितले, असा आरोप या तिघांकडून करण्यात आला. तसे केले नाही, तर इलेक्ट्रिक शॉक देण्यात येईल आणि अंगावर लाल मिरची पावडर टाकण्यात येईल, असाही आरोप तिघांकडून करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड आणि इतर पोलीसांनी हे कृत्य करण्यास लावल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. दरम्यान, बारामतीतील पोलीस उपअधीक्षक तानाजी चिखले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.