राज्यातील महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण मंडळांच्या कार्यकाळ अस्तित्वात असेपर्यंत त्यांना जे अधिकार नियमानुसार प्राप्त झाले आहेत, ते अधिकार कायम राहतील. तसेच लोकप्रतिनिधींना तुच्छ मानणाऱ्या पुणे महापालिका आयुक्तांवर कारवाई करण्यात येईल, असे ठाम आश्वासन शालेय ‍शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण मंडळांना बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाखो विद्यार्थी व नागरिकांमध्ये पसरलेला असंतोष याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली याबाबतची लक्षवेधी सूचना मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केली होती.
जनतेमधून निवडून आलेले प्रतिनिधी हे ज्येष्ठ आहेत. परंतु काही नोकरशहा आपले अधिकार वापरुन लोकप्रतिनिधींना तुच्छ मानतात आणि त्यांचे अधिकार हिरावून घेण्याचे काम करतात. त्यामुळे अशा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
प्रशासनातील नोकरशहा कायद्यातील पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करीत असतात, पण लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या नोकरशहांविरुद्ध नियमाने आणि कायद्याने कारवाई करुन त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.