घरातल्या घरात कला जोपासणारे कलाकारही आता त्या कलेच्या प्रसारासाठी तसेच विक्रीसाठी ‘ऑनलाइन’ मार्ग चोखाळत आहेत. चित्रकलेपासून घरी तयार केलेल्या दागिन्यांपर्यंतच्या वस्तूंच्या प्रदर्शनासाठी राज्यातील २५ कलाकारांनी  http://www.TheArtAndCraftGallery.comया संकेतस्थळाकडे नोंदणी केली आहे. या संकेतस्थळावर दहा देशांमधील एकूण शंभर हस्तकला व्यावसायिकांनी आपली कला सादर केली असून त्यातील २० कलाकार पुण्याचे आहेत.
मूळच्या पुण्याच्या परंतु ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या अक्षया बोरकर यांनी हे संकेतस्थळ सुरू केले असून १३ नोव्हेंबरला न्यूयॉर्क येथे ‘स्टीव्ही अॅवॉर्ड’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. ‘यंग आंत्रप्रेन्युअर’ आणि ‘स्टार्ट अप ऑफ द इअर’ या दोन गटांमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला. या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने अक्षया यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘एखादा ‘ब्रँडेड’ बूट आपण कौतुकाने सर्वाना दाखवतो, पण रस्त्यावरील मोजडीवाल्याकडून घेतलेल्या मोजडय़ांबाबत आपली ती भावना नसते. खरे तर मोजडीवाल्याची मेहनत कितीतरी अधिक असते, पण तो स्वत: आपल्या कलेविषयी काही सांगत नाही. मी क्रोशे, विणकाम, पेपर एम्बॉसिंग, तंजोर वर्क, जलरंगातील चित्रकला या गोष्टी करते. आपण बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू विकण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याचा अनुभव मी ऑस्ट्रेलियात घेतला. सध्या या संकेतस्थळावर ऑस्ट्रेलिया व भारतासह न्यूझीलंड, सिंगापूर, अमेरिका, स्पेन, पेरु, युगांडा, रिपब्लिका डोमिना अशा विविध देशांतील हस्तकला व्यावसायिक आहेत. कलाकार या माध्यमातून प्रदर्शन व विक्री करतातच पण कलाकार म्हणून त्यांची वेगळी ओळख तयार होण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.’ पुण्यात संकेतस्थळाचे कार्यालय सुरू करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हे संकेतस्थळ सशुल्क व विनाशुल्क अशा दोन्ही प्रकारात सेवा पुरवत असून विनाशुल्क प्रकारात कलाकाराला संकेतस्थळावर मोफत नोंदणी करून आपली पाच हस्तकला उत्पादने दाखवण्यास व्यासपीठ उपलब्ध होते, असे अक्षया यांनी सांगितले.