लैंगिकता हा विषय अगदी लपूनछपून बोलण्याचा समजला जातो. परंतु आता शारीरिक आकर्षण, लैंगिक संबंध याविषयी चक्क मराठीतून बोलणारे एक संकेतस्थळ सुरू झाले आहे. http://letstalksexuality.com असे या संकेतस्थळाचे नाव असून ‘तथापि’ या संस्थेतर्फे ते सुरू करण्यात आले आहे.
संस्थेतर्फे पुणे आणि सभोवतालच्या २५ महाविद्यालयांमध्ये १८ ते २४ या वयोगटातील मुलामुलांबरोबर ‘आय सोच’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लैंगिकता आणि त्याच्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा घडवून आणणे हा या प्रकल्पाचा प्रमुख हेतू आहे. या प्रकल्पाचे समन्वयक निहार सप्रे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘तरुण मुलामुलींमध्ये इंटरनेटचा वापर मोठा असून लैंगिकतेविषयीच्या आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी बऱ्याचदा पॉर्न साईट पाहणे, वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील माहिती वाचणे, मित्रमैत्रिणींशी बोलणे अशा गोष्टींचा अवलंब केला जातो. इंग्रजीत लैंगिकतेविषयी माहिती सांगणारी काही संकेतस्थळे आहेत, परंतु मराठीत ती उपलब्ध नाहीत. शरीर, लैंगिकता, लैंगिकतेतील विविधता, नातेसंबंध, प्रेम, लैंगिक संबंधांमधून पसरु शकणारे आजार या विषयी शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न या संकेतस्थळावर केला असून संस्थेच्या विश्वस्त मेधा काळे यांनी संकेतस्थळासाठीचे बरेचसे लेखन केले आहे. ‘मासिक पाळी म्हणजे काय’ अशा बऱ्याचदा पुरेशी माहिती नसलेल्या नेहमीच्या प्रश्नांची उत्तरे संकेतस्थळावर ‘एफएक्यू’ विभागात दिली आहेत.’
अभिनेत्री नेहा महाजन हिच्या उपस्थितीत शनिवारी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील ‘जहन’ या संस्थेच्या सदस्यांनी लिहिलेल्या ‘मै ये भी हूॅं’ या स्वगतांचे अभिवाचन या वेळी करण्यात आले.  प्रसारमाध्यमांमध्ये स्त्री- पुरूषांची दाखवली जाणारी ‘स्टिरिओटिपिकल’ प्रतिमा, नातेसंबंधांचे चित्रण याविषयी ‘फिल्म रीव्ह्य़ू’ हा विभागही या संकेतस्थळावर सुरू होणार असून ‘आय- सोच’ प्रकल्पात तयार केलेले लैंगिकतेविषयी माहिती देणारे लहान व्हिडीओही पाहता येतील.  भविष्यात संकेतस्थळाचा वापर करणाऱ्यांना ऑनलाईन प्रश्न विचारता येतील, तसेच दिलेल्या माहितीबद्दल आपली मते संकेतस्थळावर व्यक्त करता येतील, असे निहार यांनी सांगितले.