ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्यापासून खत तयार करणारे तीन प्रकल्प शहराच्या मध्य वस्तीत सुरू करण्यात येत असून या प्रकल्पांचे उद्घाटन शनिवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ५८ मध्ये प्रतिदिन पाच टन कचऱ्यावर तसेच प्रभाग क्रमांक ५० मध्ये प्रतिदिन तीन टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. त्या बरोबरच प्रभाग क्रमांक ३७ मध्ये प्रतिदिन पाचशे किलो कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पांचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर, नगरसेवक अशोक येनपुरे, प्रतिभा ढमाले, दिलीप काळोखे, रूपाली पाटील, हेमंत रासने, मुक्ता टिळक, आयुक्त कुणाल कुमार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. अन्य प्रभागांमधील नगरसेवक अप्पा रेणुसे, कमल व्यवहारे, मनीषा घाटे, विष्णू हरिहर, सुनंदा गडाळे तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात हेही या वेळी उपस्थित होते. या प्रकल्पांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जाणार आहे.
इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन्स या कंपनीने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे हे यंत्र तयार केले असून त्यात चोवीस तासांत खताची निर्मिती होते. प्रकल्पात तयार होणाऱ्या खताचा वापर महापालिकेच्या उद्यानांमध्ये करता येणार आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे हे यंत्र पूर्णत: स्वयंचलित असल्याचे सांगण्यात आले.
सोसायटय़ांना पुरस्कार देण्याची योजना
ज्या सोसायटय़ा कचरा सोसायटीतच जिरवतात आणि कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावतात अशा सोसायटय़ांना महापालिकेतर्फे पुरस्कार देण्याची योजना आखली जात आहे. पुरस्काराचे निकष, स्वरूप तसेच रक्कम वगैरेबाबतचा प्रस्ताव लवकरच तयार केला जाईल. आयुक्त कुणाल कुमार यांनी या योजनेचे सूतोवाच केले. महापालिकेतर्फे येत्या तीन महिन्यांत तीन, पाच आणि दहा टन प्रतिदिन कचरा प्रक्रिया क्षमतेचे प्रकल्प सुरू केले जाणार असून त्याद्वारे सव्वाशे टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल.