विश्व साहित्य संमेलनासाठी अनुदान देता येणे शक्य नसल्याचे राज्य सरकारचे धोरण संयोजकांच्या पथ्यावरच पडले आहे. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानापेक्षाही अधिक रकमेचा निधी संकलित करण्यामध्ये यश आल्याने संयोजकांचे अर्थकारणाचे गणित जुळले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून अंदमान येथे ५ आणि ६ सप्टेंबर रोजी चौथे विश्व साहित्य संमेलन होत आहे. पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ या संमेलनाची आयोजक संस्था असून ऑफबीट डेस्टिनेशन्स संयोजक आहेत. मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती ही संस्था सहसंयोजक आहे. या संमेलनासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई महापालिकेतर्फे २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. संमेलनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आणि केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी १० लाखांचा निधी दिला आहे. तर, आगामी ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची संयोजक असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी ५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. यापूर्वीच्या विश्व साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारकडून २५ लाख रुपयांचे अनुदान मिळत होते. मात्र, यंदा अनुदान देता येणे शक्य नसल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट होताच संयोजकांनी या अनुदान रकमेपेक्षाही १५ लाख रुपयांचा निधी संकलित केला असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सोमवारी दिली.
अमेरिकेतील सॅनहोजे, सिंगापूर आणि दुबई अशी तीन विश्व साहित्य संमेलने झाल्यानंतर आता तब्बल चार वर्षांनी चौथे संमेलन होत आहे. यापूर्वी कॅनडातील टोरँटो येथे होणारे संमेलन संयोजक संस्थेला निधी संकलित करण्यामध्ये अपयश आल्यामुळे रद्द करावे लागले होते. त्या वेळी या संमेलनासाठी दिलेले २५ लाख रुपयांचे अनुदान साहित्य महामंडळाला परत करावे लागले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होऊ घातलेले संमेलन साहित्य महामंडळाने आधी सरकारच्या अनुदानाची रक्कम मिळवून द्यावी, अशी अट संयोजक संस्थेने घातल्यामुळे रद्दबातल झाले. राज्यातील सत्तेमध्ये बदल झाल्यानंतर विश्व साहित्य संमेलनासाठी निधी देता येणे शक्य नसल्याचे राज्य सरकारतर्फे सूचित करण्यात आले. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतींना समर्पित या संमेलनासाठी अर्थकारणाचे गणित जुळवताना निधीची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.