पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त शक्तिशाली आहेत. महिलांमध्ये प्रचंड क्षमता व ऊर्जा आहे. आपण काहीच करू शकत नाही, या भावनेतून नवऱ्यावर अवलंबून राहण्याची फार पूर्वीपासूनची मानसिक महिलांमध्ये आजही आहे, ही मानसिकता बदलली पाहिजे, असे आवाहन ज्येषठ लेखिका सुधा मूर्ती यांनी केले.
मेहता पब्लिसिंग हाऊसच्या वतीने सुधा मूर्ती यांच्या ‘परिघ’ या मराठी अनुवादित कादंबरीचे प्रकाशन भावे हायस्कूलच्या शिक्षिका मृणाल वैद्य व ज्ञान प्रबोधिनीच्या मृदुला पाठक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ लेखिका वीणा देव, कादंबरीच्या अनुवादिका उमा कुलकर्णी व प्रकाशक सुनील मेहता या वेळी उपस्थित होते.
मूर्ती म्हणाल्या, की जीवनातील मानवी नात्यातल्या विविध भूमिका लीलया पार पाडत असल्यामुळे महिला ‘उत्कृष्ट मॅनेजर’ आहेत. फार पूर्वी महिलांनी खूप काही सहन केले. आपण काहीच करू शकत नाही, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली व त्या काळापासूनच नवऱ्यावर अवलंबून राहण्याची मानसिकता तयार झाली. त्यात आजही बदल झालेला नाही. महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आसपासच्या परिस्थितीचे भान ठेवून ज्ञान अद्ययावत केले, तर महिला खूप काही साध्य करू शकतात. ‘परिघ’ कादंबरी याच महिलांच्या सुप्तगुणांना अधोरेखित करते. त्यामुळेच आजवरच्या माझ्या वाङ्मयामध्ये ही कादंबरी सवरेत्कृष्ट आहे.
महाराष्ट्र ही माझ्या विचारांची भूमी आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, की इतर भाषांपेक्षा मराठीत माझे साहित्य मोठय़ा प्रमाणावर वाचले जाते. मराठी भाषकांना माझ्या साहित्याचे आकर्षण आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. या प्रेमाच्या बंधनातून कधीच मुक्त होण्याची माझी इच्छा नाही.