परिसरातील वाढत्या गुन्हेगारीने महिला सुरक्षा ऐरणीवर

‘आयटी हब’ म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील हिंजवडी, तसेच खराडी भागात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची मोठी संख्या आहे आणि हजारो अभियंत्यांची, कर्मचाऱ्यांची तेथे सदैव वर्दळ असते. या भागात मोठय़ा संख्येने परप्रांतातून आलेले तरुण नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. गेल्या शुक्रवारी (२३ डिसेंबर) तळवडे येथील आयटी कंपनीत कामाला असलेल्या अंतरा दास या संगणक अभियंता तरुणीचा हल्लेखोराने भोसकून खून केल्यानंतर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी पुणे शहरात संगणक अभियंता नयना पुजारी, दर्शना टोंगारे, ज्योतीकुमारी या महिलांचे खून झाले. महिलांसंबंधी होणाऱ्या गुन्ह्य़ांबरोबरच या कंपन्यांच्या परिसरात लुटमारीच्या घटनादेखील वाढल्या आहेत.

मूळची पश्चिम बंगालची रहिवासी असलेली अंतरा देबानंद दास (वय २३) ही तळवडे भागातील केपजेमिनी कंपनीत कामाला होती. शुक्रवारी (२३ डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास ती कंपनीतून घरी निघाली होती. त्यावेळी तळवडेतील केएनबी चौकात एका हल्लेखोराने अंतराला गाठले आणि तिच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. अंघारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंतराला एका दुचाकीस्वाराने पाहिले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच ती मरण पावली होती.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्या शहरापासून लांब अंतरावर आहेत. तळवडे आयटी पार्कचा भाग हा ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येतो. वर्षभरापूर्वी ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत असलेला काही भाग पुणे पोलीस आयुक्तालयाला जोडण्यात आला. सिंहगड रस्ता, हिंजवडी हे भाग पुणे पोलीस आयुक्तालयाशी संलग्न करण्यात आले आहेत. मात्र, या भागाचा विस्तार मोठा आहे. ग्रामीण भाग तेथून जवळच आहे. या भागात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे मोठय़ा संख्येने या भागात परप्रांतीय मजूर बांधकामांच्या ठिकाणी रहायला आले आहेत. पोलिसांचे मनुष्यबळ पाहता एवढय़ा मोठय़ा परिसरात त्यांना गस्त घालणे शक्य नाही. सिंहगड, उत्तमनगर, दिघी, चंदननगर, वाकड या पोलीस ठाण्यांची निर्मिती वर्षभरापूर्वी झाली. या पोलीस ठाण्यांना देण्यात आलेले मनुष्यबळ अपुरे आहे. कारण पुण्यातील मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यांना तीनशे पोलिसांची आवश्यकता असताना तेथील पोलीस ठाण्यांचा कारभार दीडशे ते पावणेदोनशे पोलिसांच्या बळावर चालवला जात आहे. ग्रामीण भाग शहर पोलिसांना जोडण्यात आला असला तरी तेथे मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण मोठय़ा संख्येने हिंजवडी, वाकड, बाणेर, पाषाण भागात राहायला आहेत. त्यामुळे या भागात रात्री अपरात्री लुटमारीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. चोर, भुरटय़ांचा या भागातील निर्जन ठिकाणी वावर असतो. हिंजवडी आयटी पार्क भाग पुणे-बंगळुरू बाह्य़वळण मार्गावर आहे. त्यामुळे तेथे अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अपघातात संगणक अभियंत्यांचे अनेक अपघात या भागात होत असतात.

हद्दीचाही वाद

माहिती तंत्रज्ञानाच्या कंपन्या असलेले हिंजवडी आणि तळवडे हे भाग पुणे शहरापासून लांब आहेत. तळवडे भाग पिंपरी-चिंचवड शहराला लागून आहे. तळवडे आयटी पार्क पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येतो. एखादा गुन्हा ग्रामीण आणि पुणे पोलिसांच्या वेशीवर घडला की हद्दीचा वाद उपस्थित केला जातो. हद्द निश्चित झाल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करतात. त्यानंतर तपास सुरू होतो. त्याचा त्रास तक्रारदाराला होतो. त्याला पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतात.