चकचकीत दुनियेतील स्त्रियांविषयीचे लेखन आपल्याकडे सातत्याने होते. पण, तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या आणि अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या सामान्यांतील असामान्य स्त्रियांविषयी लेखन करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी रविवारी व्यक्त केली. असे लेखन खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असते, असेही त्या म्हणाल्या.
साधना प्रकाशनतर्फे नीती बडवे यांच्या ‘बिकट वाट’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्या बाळ यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा आणि ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते. या पुस्तकातील सुभद्राबाई पाटील, नागिणी सुरवसे, राजश्रीताई जाधव आणि शांताबाई जाधव या नायिकांनी आपली वाटचाल या प्रसंगी मांडली.
शहरातील स्त्रियांना छोटेसे दु:खही आभाळाएवढे वाटू लागते. पण, ग्रामीण भागातील स्त्रियांच्या समस्या आपण जाणून घ्यायला हव्यात, असे सांगून विद्या बाळ म्हणाल्या, स्त्री या नात्याने आपण अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो. पण, आपल्यालाही काही हक्क आहेत याची जाणीव नसते. हक्क मागितले तर बऱ्याचदा ते मिळतही नाहीत. पण, हक्कांची जाणीव तिला असायला हवी. बिकट वाट पुस्तकातील सहा स्त्रिया या समाजातील खऱ्या अर्थाने नायिका आहेत.
समाजामध्ये अंधश्रद्धा, निरक्षरता आणि गरिबी या तीन प्रमुख समस्या असल्याचे सांगून पन्नालाल सुराणा म्हणाले, या समस्यांच्या निराकरणासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याबरोबरीनेच स्त्रियांमध्ये हिंमत वाढविण्याची आवश्यकता आहे.