एका चौरस कागदापासून फक्त घडय़ा घालून निर्मिलेले प्राणी, पक्षी, फुले आणि मानवी आकृती.. दिल्लीच्या लोटस टेम्पलची केलेली प्रतिकृती.. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी निर्मिलेल्या कलाकृती.. मूळची जपानी कला असलेल्या ओरिगामीच्या वेगवेगळ्या कलाकृतींचा समावेश असलेल्या ‘वंडरफोल्ड’ ओरिगामी प्रदर्शनास गुरुवारपासून सुरुवात झाली.
ओरिगामी मित्र संस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे भरविण्यात आलेले हे प्रदर्शन रविवापर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात खुले राहणार आहे. ओरिगामी ही मूळची जपानची कला. यामध्ये एका चौरस कागदापासून फक्त घडय़ा घालून कलाकृती तयार केल्या जातात. साधारणत: कागद कापत किंवा चिकटवीत नाहीत. तर, कागदाच्या घडय़ा घालून कलाकृती साकारली जाते. या प्रदर्शनामध्ये युनिट ओरिगामी हा वेगळा प्रकारही पाहावयास मिळणार आहे. यात घडय़ा घालून एक युनिट तयार केले जाते. लेगोप्रमाणे अशी युनिट्स एकमेकाला जोडून वेगवेगळ्या कलाकृतींचा आविष्कार घडविला जातो. अशी जवळपास सहा हजार युनिटस वापरून साकारलेली दिल्ली येथील लोटस टेम्पलची प्रतिकृती या प्रदर्शनामध्ये मध्यभागी ठेवण्यात आली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी निर्मिलेल्या ओरिगामी कलाकृती या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ते स्वत: सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी चार ते आठ या वेळात उपस्थित राहून ओरिगामीतील गमतीजमतीचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत, असे ओरिगामी मित्र संस्थेचे विश्वास देवल यांनी सांगितले. प्रदर्शनानंतर ओरिगामीचे क्लासेस घेतले जाणार असून त्याची नोंदणी या प्रदर्शनाच्या वेळेतच केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.