दुकानाचे कामकाज सुरळीत असल्याचा दावा

‘चितळे बंधू मिठाईवाले’ यांच्या एका उत्पादन केंद्रामधील कर्मचारी संपावर गेल्यामुळे खवय्या पुणेकरांच्या मागणीनुसार खाद्यपदार्थाचा पुरवठा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सणावाराचा श्रावण महिना सुरू असताना चितळे यांच्या दुकानांतून नारळबर्फी, डिंक लाडू, रवा लाडू, स्पेशल मोतीचूर लाडू, आंबावडी, आलेपाक, स्पेशल चिवडा हे पदार्थ सध्या मिळत नाहीत. मात्र, दुकानाचे कामकाज हे पूर्णपणे सुरळीत सुरू असल्याचा दावा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार श्रीकृष्ण चितळे यांनी केला आहे.

चितळे बंधू मिठाईवाले यांची शनिपार आणि डेक्कन जिमखाना अशी दोन दुकाने असून चितळे यांच्या उत्पादनांची विक्री करणारी शहरभरात १४ दुकाने आहेत. चितळे स्वीट्सची गुलटेकडी येथे दोन उत्पादन केंद्र आहेत. त्यापैकी एका उत्पादन केंद्रातील १२० कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी २० जुलैपासून संपावर आहेत. हे सर्व कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक संघटनेशी संलग्न आहेत.

गुलटेकडी येथील एक उत्पादन केंद्र बंद असल्याने उर्वरित उत्पादन केंद्रावर अतिरिक्त भार आला आहे. या केंद्रात उत्पादित केले जाणारे खाद्यपदार्थ पुणेकरांची मागणी पूर्ण करू शकत नाहीत, असे चित्र आहे. चितळे यांच्या दुकानामध्ये ‘काही अपरिहार्य कारणांमुळे नारळबर्फी, डिंक लाडू, रवा लाडू, स्पेशल मोतीचूर लाडू, आंबावडी, आलेपाक आणि स्पेशल चिवडा हे पदार्थ मिळणार नाहीत,’ असा फलक लावण्यात आला आहे.

दरम्यान, चितळे बंधू मिठाईवाले यांच्या दुकानातील कामगारांचा कोणताही संप सुरू नाही. दुकानातील कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये दीड महिन्यांपूर्वीच नवे वेतन करार झालेले आहेत. त्यामुळे दुकानाचे कामकाज हे पूर्णपणे सुरळीत सुरू आहे, असे चितळे बंधू मिठाईवाले यांचे भागीदार श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले. चितळे बंधू यांच्या उत्पादन केंद्रांपैकी केवळ एका केंद्रामध्ये (चितळे स्वीट अँड स्नॅक्स) तात्पुरते काम बंद असून त्या ठिकाणी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये वेतनवाढीसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असल्याचेही चितळे यांनी सांगितले.