पुण्यात वाढतीसंख्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आखाती देशातील येमेनमध्ये सुरू असलेली यादवी आणि तेथे वारंवार होत असलेल्या गोळीबारामुळे जखमी झालेले येमेनी नागरिक उपचारासाठी मोठय़ा प्रमाणात भारतात येत असून, त्यातही पुणे शहरातील रुग्णालयांना प्राधान्य देत आहेत. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, गुरुग्राम या शहरांच्या तुलनेत पुण्यातील वैद्यकीय उपचार तुलनेने किफायतशीर असल्याने आखातातील रुग्णांचा पुण्यात उपचार घेण्याचा कल वाढला आहे.

भारतात उपचारासाठी येणारे परदेशी नागरिक मेडिकल व्हिसा घेऊन, तर त्यांच्यासोबत येणारे नातेवाइक मेडिकल अटेंडंट म्हणून वास्तव्यास येतात. चालू वर्षांत सप्टेंबर अखेर मेडिकल व्हिसा मिळवून २१७ परदेशी नागरिक उपचारासाठी पुण्यात दाखल झाले. त्यांच्यासोबत मेडिकल अटेंडंट म्हणून १८१ नातेवाइक आले होते. उपचारासाठी दाखल झालेल्या २१७ पैकी १५१ रुग्ण येमेनमधील आहेत. त्यांच्यासोबत १४१ नातेवाईक मेडिकल अटेंडंट म्हणून आले आहेत. तर, गेल्या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये येमेनमधील १२० रुग्ण पुण्यात उपचारासाठी आले होते. त्यांच्यासोबत ७७ नातेवाइक मेडिकल अटेंडंट म्हणून आले होते. सन २०१६ मध्ये एकूण मिळून २८६ परदेशी नागरिकांनी पुण्यात उपचार घेतले होते. पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाकडून (एफआरओ) ही माहिती देण्यात आली.

आखाती देशातील आणि विशेषत्वाने येमेनमधील रुग्णांची संख्या पुण्यात वाढत आहे. येमेनमधील रुग्ण स्टेशन, शिवाजीनगर आणि वानवडी परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेतात. बहुतांश रुग्ण गोळीबारात जखमी झालेले असल्याने त्यांच्यावर प्रामुख्याने तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातात. यासंदर्भात रुबी हॉल क्लिनिकचे सरव्यवस्थापक सचिन दंडवते म्हणाले, की परदेशातील रुग्ण उपचारासाठी मुंबई, बंगळुरु, दिल्ली, गुरुग्राम आणि पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होतात. अन्य शहरांच्या तुलनेत पुण्यात मिळणारे उपचार माफक दरात होतात. पुण्यात मोठय़ा संख्येने परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. त्यात सर्वाधिक विद्यार्थी आखाती देशांमधील आहेत. येमेनमधील विद्यार्थी पुण्यात मोठय़ा संख्येने शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. त्यामुळे येमेनी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पुण्यात उपचार घेण्यासाठी पसंती देतात.

पुण्यातील उपचार तुलनेने स्वस्त आहेत. तसेच पुण्यातील वातावरण परदेशी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना आवडते. त्यामुळे परदेशी रुग्णांचा कल वाढत आहे, असे निरीक्षणही दंडवते यांनी नोंदविले.

पुण्यात परदेशातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांसोबत नातेवाईकदेखील येतात. अन्य शहरांच्या तुलनेत पुण्यातील उपचार माफक दरात होत आहेत. त्यामुळे मेडिकल व्हिसावर येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. काही रुग्ण मेडिकल व्हिसाची मुदतदेखील वाढवून घेतात.

ज्योतीप्रिया सिंग, पोलीस उपायुक्त विशेष शाखा, परकीय नोंदणी विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yemen crisis yemeni patients
First published on: 07-10-2017 at 05:23 IST