योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. अय्यंगार यांना प्रकृतिअस्वास्थ्यामुळे गेल्या आठवड्यात पुण्यातील प्रयाग रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अय्यंगार यांच्या निधनाबद्दल ट्विटरवरून शोक व्यक्त केला.

 

योगाचार्य अशी ओळख असणाऱ्या बी के एस अय्यंगार यांचे १९६६ साली ‘लाईट ऑन योगा’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचा १७ भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. अय्यंगार यांनी आतापर्यंत एकूण १४ पुस्तकांचे लिखाण केले आहे. त्यांच्या या योगदानामुळे सरकारकडून त्यांना सर्वप्रथम १९९१ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर २००२ मध्ये ‘पद्मभूषण‘ तर २०१४ मध्ये ‘पद्मविभूषण‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. टाइम्स मासिकाच्या जगातील १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये अय्यंगार यांचा समावेश करण्यात आला होता.