जिल्हा प्रशासनाकडून फोटो व्होटर स्लिप मिळाली नसेल तर छायाचित्र असलेला ओळखपत्राचा पुरावा दाखवून मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ज्यांना फोटो व्होटर स्लिप मिळाली नसेल अशा मतदारांसाठी मतदान केंद्रांवर ही स्लिप देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी मंगळवारी ही माहिती दिली. बोगस मतदान टाळण्याच्या उद्देशातून यंदा निवडणूक आयोगाकडून मतदारांना फोटो व्होटर स्लिप देण्यात येत आहे. मात्र, गुरुवारी (१७ एप्रिल) प्रत्यक्ष मतदान होणार असताना अद्यापही अनेक मतदारांना फोटो व्होटर स्लिप मिळालेल्या नाहीत. या संदर्भात सौरभ राव म्हणाले, आतापर्यंत ३६ लाख ५६ हजार ५६५ मतदारांना स्लिपचे वितरण करण्यात आले असून २९ लाख मतदारांना स्लिपचे वाटप करण्याचे काम बाकी आहे. जुन्नरमध्ये सर्वाधिक ३३ टक्के तर, पुरंदरमध्ये १५ टक्के मतदारांना स्लिप वितरित करण्यात आल्या आहेत. कोथरूड आणि पर्वतीमध्ये प्रत्येकी ३६ टक्के, कसब्यामध्ये २७ टक्के, वडगाव शेरीमध्ये ३५ टक्के तर िपपरीमध्ये ३० टक्के मतदारांना फोटो व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. काही ठिकाणी पत्ते सापडण्यामध्ये कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. या स्लिप मतदारांच्या हाती द्यायच्या असल्यामुळे घराला कुलूप असल्याने कित्येक मतदारांना वाटप करणे शक्य झालेले नाही.