वडगाव शेरी भागातील घटना; चार पंचांविरुद्ध गुन्हा
आंतरजातीय प्रेमविवाह करण्यास मदत केल्याने जातीतून बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीच्या छळाला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२९ ऑगस्ट) सकाळी घडली. या प्रकरणी गवळी समाजाच्या जातपंचायतीतील चार पंचांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण किसन नायकु जी (वय ४८, रा.दत्त चौक, गवळी वाडय़ाशेजारी, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी गवळी समाजाच्या जातपंचायतीच्या पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी दिली. अरुण नायकुजी यांचा भाऊ अप्पा यांचा धीरज पंगुडवाले मित्र आहे. धीरज गवळी समाजातील आहे. तो खडकी बाजार येथे राहायला आहे. पाच वर्षांपूर्वी धीरजने पंढरपूर येथे आंतरजातीय विवाह केला होता. विवाह सोहळ्यास अप्पा, अरुण नायकुजी यांच्यासह त्यांचे नातवाईक उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी धीरजची पत्नी दुसऱ्या समाजातील असल्याची माहिती जातपंचायतीतील पंचांना मिळाली. अरुण यांचा भाऊ अप्पा यांच्या पुढकाराने आंतरजातीय विवाह झाल्याचा ठपका पंचांनी ठेवला.
दोन वर्षांपूर्वी लष्कर भागातील बुट्टी स्ट्रीट येथे असलेल्या गवळी वाडय़ात पंचांनी समाजाची बैठक आयोजित केली. अरुण, अप्पा नायकुजी तसेच बाळू गडाप्पा यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. त्यानंतर अरुण यांनी पंचांची भेट घेतली. आम्हाला पुन्हा जातीत घ्या, अशी विनंती त्यांनी वेळोवेळी केली. त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. सोमवारी पहाटे अरुण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अरुण यांचा मुलगा सूरजने या संदर्भात फिर्याद दिल्यानंतर चार पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगर तपास करत आहेत.