रेल्वे रुळ ओलांडताना शॉर्टकट मार्गाची शक्कल लढवणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. स्थानकावर उभी असलेल्या रेल्वे गाडीच्या टपावरुन जात असताना उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्यामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला. पिंपरी चिंचवडमधील देहूरोड येथे हा अपघात झाला. अहमद युसूफ खत्री (वय १८) (रा.देहूरोड, सुभाष चौक) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रत्येक गुरुवारी देहूरोड परिसरात पाणी येत नाही. तसेच दिवसभर वीज देखील नव्हती. त्यामुळे रेल्वे स्थानकावरुन पाणी आणण्यासाठी अहमद हा तरुण घरातून बाहेर पडला. पाणी भरुन परत येत असताना रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी त्याने स्थानकावर उभी असलेल्या रेल्वे गाडीवर चढून जाण्याची शक्कल लढवली. मात्र, ही शक्कल त्याच्या चांगलीच अंगलट आली. रेल्वेच्या टपावरुन जात असताना उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला त्याचा स्पर्श झाला. वीजेच्या झटक्याने त्याच्या शरिराला आगीने जखडले होते. रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी प्रसंगावधन दाखवत त्याला लागलेली आग विझवली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अंगावरून मालगाडी जाऊनही सुखरूप बचावले पिता-पुत्र

या तरुणाला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अहमद युसूफ खत्री हा यात ८० टक्के भाजला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.