दक्षिण ध्रुवाचा बर्फाळ प्रदेश, हाडं गोठवणारी थंडी, त्यात १३ दिवसांची संशोधनमोहीम, जगभरातले ६६ विद्यार्थी अन् त्यात भारताची एकमेव प्रतिनिधी.. ही प्रतिनिधी होती पुण्याची १९ वर्षीय विद्यार्थिनी झरीन चीमा! झरीनाने ‘स्टुडंट्स ऑन आईस २०१४’ अंतर्गत अंटाक्र्टिकावरील संशोधनमोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
‘स्टुडंट्स ऑन आईस’ ही एक कॅनेडियन संघटना आहे, जी जगभरातील विद्यार्थ्यांना पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांवर विविध शोध करण्याची संधी देते. गेल्या वर्षी जूनमध्ये या मोहिमेसाठी निवड झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना शोधमोहिमेचा विषय निवडायचा होता. पुण्यातील कमिन्स कॉलेजची मॅकेनिकल इंजिनियरिंगची दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या झरीनने ‘एलआयडीआर’ (लाईट डायरेक्शन अँड रेंजींग) हा विषय निवडला. याचा अर्थ रिमोट तंत्रज्ञानाद्वारे एखादे लक्ष्य प्रकाशित करून व त्याच्या परावर्तनाचे विश्लेषण करून अंतर कसे मोजता येईल हे पाहणे. परंतु, त्यासाठी खूपच खर्च येणार होता. इतकी मोठी रक्कम कशी mu02उभी केली, यावर झरीनने सांगितले, ‘‘लहान असताना बाबांनी पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राबद्दल अनेक गोष्टी सांगितल्यामुळे अंटाक्र्टिकाला जायची माझी खूप आधीपासूनची इच्छा होती. त्यासाठी मी इंटरनेटवर माहिती शोधली आणि मला स्टुडंट्स ऑन आईसची माहिती मिळाली आणि मग मी त्यादृष्टीने प्रयत्न केले,’’ अंटाक्र्टिका मोहिमेमुळे पुण्याच्या या कन्येचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कठीण परिस्थितीत विचलित न होता स्वत:ला कसे सिद्ध करायचे, हे या मोहिमेद्वारे झरीन शिकली. ‘‘संघर्षांचा खरा अर्थ मी या मोहिमेमुळे शिकले. बर्फात प्रत्येक पाऊल पुढे टाकताना आपण इतर वेळेला किती सुखात जगतो, याची जाणीव होत होती. बर्फात अचानक बूट अडकणे किंवा शून्य अंशाच्या खाली तापमानात हाथमोजा सटकून पडणे हा अत्यंत भितीदायक अनुभव होता. एका बाजूला प्रतिकूल वातावरण तर दुसऱ्या बाजूला तिथली प्रचूर मात्रेत जैवविविधता बघून मला जगण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला.पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्रात होणारे वातावरणीय बदल आणि त्यासंबंधी बरच काही अभ्यासपूर्ण पद्धतीने शिकता आले..’’ अशा शब्दात झरीनने थरारक अनुभवांचे कथन केले.