भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये दाखल होणारे नवज्योतसिंग सिध्दू यांनी भाजप आणि अकाली दलावर टीकास्त्र सोडले आहे. काही लोक म्हणतात सिध्दूसाठी पक्ष म्हणजे माता होती. पण आई ही कैकेयसारखीही असू शकते. पंजाबमध्ये मंथरा कोण हे सर्वांनाच माहितीये अशी टोलेबाजी करत सिध्दू यांनी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.

रविवारी नवज्योतसिंग सिध्दू यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर सोमवारी नवज्योतसिंग सिध्दू यांनी पहिल्यादांच पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते अजय माकन यांनी सिध्दू यांचे स्वागत केले. या परिषदेत सिध्दू यांनी भाजपला चिमटा काढतानाच पंजाबमधील सत्ताधारी अकाली दलावर हल्लाबोल केला. मी जन्मतःच काँग्रेसवादी असून काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश म्हणजे माझी घरवापसीच आहे असे ते म्हणालेत. भाजपने त्यांच्या मित्रपक्षाची निवड केली, तर मी पंजाबची निवड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे आहेत हे जनताच ठरवेल असे त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये पंजाबचे हित दिसल्याने मी या पक्षात आलो असे सांगतानाच काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांसोबतच्या वादावर सिध्दूंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. पंजाबमधील काँग्रेस नेते अमरिंदर सिंग यांच्यासोबत सिध्दू यांचे मतभेद असल्याची चर्चा आहे. याविषयीच्या प्रश्नावर सिध्दू म्हणाले, दोन देशांमधील वादावार तोडगा निघू शकतो तर मग आमच्यात का नाही निघणार.

पत्रकार परिषदेत सिध्दू यांचा टीकेचा रोख अकाली दलावर जास्त होता. पंजाब माझ्यासाठी अभिमान आहे. पण आज या राज्याची प्रतिमा धूळीस मिळाली आहे. अंमली पदार्थांनी राज्याला विळखा घातला आहे. पोलीसांचे अस्तित्व फक्त पुतळ्यासारखे झाले आहे. ड्रग्स माफिया आणि नेतेमंडळी यांची भ्रष्ट साखळी तयार झाली आहे अशी टीका त्यांनी केली. पंजाबमधील अंमली पदार्थाच्या साखळीवर चित्रपट निघतो. मग सत्ताधा-यांना याची माहिती नाही का. अंमली पदार्थांमुळे पंजाबमधील तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. बादल यांनी खुर्ची सोडून पळ काढावा, आता पंजाबमधील जनता येत आहे. पक्ष जिथून सांगणार तिथून मी निवडणूक लढवण्यास तयार आहे असे त्यांनी सांगितले.  काँग्रेस सत्तेवर आल्यास पंजाबमधून ड्रगमाफियांना हद्दपार करु अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. पंजाबमध्ये अन्नदात्याला भिकारी बनवले. राज्याची प्रतिष्ठा धूळीस मिळवली. मग याविरोधात लढा द्यायला नको का ?, ही सिध्दूची वैयक्तिक लढाई नाही. ही पंजाबच्या अस्तित्व आणि स्वाभिमानाची लढाई आहे असे त्यांनी सांगितले.