भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये सामील झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी दोनच दिवसांपूर्वी अमृतसरमधून (पूर्व) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर या विद्यमान आमदार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सिद्धू यांनी आपल्याजवळील चल व अचल संपत्तीची माहितीही दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ५२.५५ कोटींची संपत्ती आहे. यात ४२.१२ कोटींची मालमत्ता ही सिद्धू यांच्या नावावर तर पत्नीच्या नावावर १०.४३ कोटींची संपत्ती आहे. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये ३.६ पटीने वाढ झाली आहे.

सिंद्धूकडील संपत्तीत तब्बल ४४ लाख रूपयांची घड्याळे आहेत. याचा उल्लेख त्यांनी २००९ च्या प्रतिज्ञापत्रात केला नव्हता. त्याचबरोबर पत्नीकडे ३६ लाख रूपयांच्या हिऱ्याचाही या वेळी प्रथमच उल्लेख करण्यात आला आहे.
सिद्धू यांच्याकडे २००९ मध्ये लँड क्रूझर, कॅरोला, अॅम्बेसेडर, इंडेव्हर आणि स्कोडा होती. २०१४ मध्ये दोन लँड क्रूझर, मिनी कूपर आणि फॉच्यूर्नर गाड्यांचा समावेश होता. परंतु २०१७ ची आकडेवारी समजू शकलेली नाही.
२०११ मध्ये त्यांनी अमृतसर येथे ३१.०५ कोटींचा प्लॉट खरेदी केला. त्याचबरोबर त्यांच्या दुसऱ्या प्लॉटसाठी त्यांनी ८८ लाख रूपये आगाऊ रक्कम दिलेली आहे.
सिद्धू यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते भाजपचे राज्यसभा सदस्य होते. आपल्या खासदारकीचा राजीनाम देऊन ते काँग्रेसमध्ये आले आहेत. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पदाचे दावेदार अमरिंदर सिंग यांच्याबरोबर त्यांचे संबंध चांगले नसल्याचे सांगण्यात येते. सिद्धू हे उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचेही समजते.

 

cats-55-670x447