lp57‘बालपणीचा काळ सुखाचा’ ही उक्ती सार्थ ठरवत, लक्ष्मण शंकर लोकरे यांनी त्यांच्या लहानपणीच्या रम्य स्मृतींमध्ये दडलेल्या, त्यांना विशेष भावलेल्या अशा सायंकाळच्या विविध रूपांचे दर्शन आणि त्याच्या जोडीने अनुभवलेले आनंददायी क्षण ह्यंचा विलोभनीय प्रवास ‘मनातल्या सायंकाळी’ ह्य पुस्तकातून घडवला आहे. रोज त्याच त्या प्रकारचे साचेबद्ध शहरी जीवन जगणाऱ्या आपल्याला ह्य संधिप्रकाशातील सायंकाळीमध्ये पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो एवढे नक्की. लहानपणी कुठल्याही विकतच्या साधनांशिवाय सवंगडय़ांसोबत निसर्गाशी एकरूप होऊन खेळलेल्या विविध खेळांचे वर्णन वाचताना आपणही नकळत आपल्या बालपणात शिरतो. त्या आठवणी एक वेगळाच आनंद देऊन जातात.
संध्याकाळ हा दिवस संपतानाचा काळ. या वेळेला माणसांच्या जीवनात वेगळंच स्थान असतं. लहानांना ती उद्याकडे नेणारी वाटू शकते. तरुणांना ती रम्य वाटू शकते तर वृद्धांना ती जीवनाच्या अंतिम सत्याची जाणीव करून देणारी वाटू शकते. त्यातही एखादी संध्याकाळ तुम्ही कुठे घालवता यावरही ती कशी असेल हे अवलंबून असतं. अशा आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या संध्याकाळींचं ललित वर्णन लेखकाने या पुस्तकात केलं आहे.
माळावरील उंच जागी असलेल्या ओबडधोबड दगडावर बसून दूरवर पसरलेलं गावचं शिवार न्याहाळण्याचा छंद लेखकाला जडतो. त्यातून त्या दगडाबद्दल आपुलकी निर्माण होऊन, तो जणू काही आपला मित्र आहे ह्य भावनेने त्याच्याशी मनमोकळा संवाद साधला जातो. त्याचे वर्णन ‘माळावरची सायंकाळ : दगडमित्र’मध्ये केले आहे.
‘अंगणातील सायंकाळ : लपंडाव’मध्ये शाळा सुटल्यावर घराच्या कडेला असणारा रस्ता अंगण म्हणून वापरून मनसोक्त काळोख पडेपर्यंत रंगणाऱ्या लपंडावाचे वर्णन आहे.
शाळेतील कोंडवाडय़ातून सुटल्यावर गवताच्या गंजीच्या आधारे कोंडारात काळोख पडेपर्यंत खेळल्या गेलेल्या लंपडावाचे वर्णन ‘कोंडारातील सायंकाळ : पुन्हा एकदा लपालपी’मध्ये केले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत जिवाची काहिली करणाऱ्या, वैशाख वणव्यात दिवसभर अडकून पडल्यावर, सूर्यास्तसमयी सर्व सवंगडी ओहोळातील जांभळीखाली जमून जांभळे खाऊन पकडापकडीचा खेळ खेळायचे त्याचे रमणीय वर्णन ‘ओहळातील सायंकाळ : जांभळाचे दिवस’ ह्य लेखात केले आहे.
संध्याकाळी शेतात जाऊन पाखरांपासून शेतराखणीचे काम करावे लागे तेव्हा पाखरांना पुन्हा पुन्हा हुसकावणे आणि नजर चुकवून पाखरांनी पुन्हा जोंधळ्यावर येणे ह्याचे वर्णन ‘शेतातील सायंकाळ : स्पर्धा’मध्ये केले आहे.
उन्हाळी सुट्टीत दोन दगडांच्या खबदाडीत हिरवळीच्या जागी भल्या मोठय़ा दऱ्यांमध्ये गुरे चरायला सोडून वडाखाली सूरपारंब्यांचा खेळ रंगत असे. त्याचे मजेशीर वर्णन ‘दऱ्यातील सायंकाळ : सूरपारंब्या’ ह्य भागात केले आहे. त्याचबरोबर ‘शिवारातील सायंकाळ : सूरपाटय़ा’मध्ये रिकाम्या शेतात खेळल्या गेलेल्या सूरपाटय़ांचे वर्णन आहे. नित्यनियमाप्रमाणे डोंगराकडे जाताना वाटेत अचानक झालेल्या प्राण्याचे दर्शन आणि नंतर तो वाघ होता हे कळल्यावर वाटलेली भीती ह्यचे वर्णन ‘दरीतील सायंकाळ : मी आणि वाघ’मध्ये आहे.
दिवाळीसाठी सरपण गोळा करताना तीन ते साडेतीन तास लागत. मध्येच विसावा घेऊन वनरक्षक घरी गेल्यावर परतीची वाट धरली जात असे. ह्य विसाव्याच्या ठिकाणाहून दिसणारे गावाचे आणि निसर्गाचे विलोभनीय वर्णन ‘डोंगरातील सायंकाळ : विसावा’मध्ये केले आहे.
रोज सायंकाळी निसर्गाच्या बदलत्या रूपाचा आस्वाद घेत, मिळणारा आनंद त्याच त्याच स्वरूपाचा वाटल्यामुळे आता याहून जास्त उच्चकोटीचा आनंद देणारा क्षण लेखक शोधू लागतात. खरा आनंद घेण्यापेक्षा देण्यात आहे ह्याची जाणीव करून देणाऱ्या तीन घटना पाहायला मिळतात. त्यांचे वर्णन ‘गावकुसातील सायंकाळ : निर्धार’मध्ये केले आहे.
नव्याने वसत असलेल्या शहरात परिचित व्यक्तीचा शोध घेताना लेखक मेटाकुटीला येतात. दिवसभर शोधून थकल्यावर काळोख पडू लागल्यावर अचानक ती व्यक्ती त्यांच्या समोर येते. ह्य गोष्टीचे वर्णन ‘नगरातील सायंकाळ : सांजदेवता’मध्ये केले आहे.
एका सायंकाळी गच्चीतील झोक्यावर बसले असताना बंगल्याजवळील गुलमोहोर आणि रस्त्याच्या वळणावरील आंबा ह्यंच्यातील संवाद ऐकू येतो. त्या संवादाचे वर्णन ‘गच्चीतील सायंकाळ : आंबा आणि गुलमोहोर’ ह्यत केले आहे.
नोकरीनिमित्त शहर ही कर्मभूमी व राहण्याचे ठिकाण झाले असले तरी गावाविषयीची न संपणारी ओढ वाढतच असते. शहरात राहूनही मन मात्र गावमय होत असते. ती अस्वस्थता दूर करण्यासाठी लेखक त्यांच्या पत्नीला घेऊन गावाला जातात. त्या दोघांनी अनुभवलेल्या एका रम्य सायंकाळचे वर्णन ‘तलावातील सायंकाळ: एक अनोखा प्रवास’ ह्य भागात केले आहे.
प्रत्येक सायंकाळी मावळतीकडे निघालेला सूर्य लेखकांच्या मनातील भावनांशी तादात्म्य पावून त्याच भावना मनात घेऊन चालला आहे. लेखक आणि सूर्यास्ताकडे कलणारा सूर्य ह्य दोघांतील भावनांची काल्पनिक समरसता प्रत्येक संध्याकाळीतून वर्णिली आहे. लेखकाने दाखवलेली संध्याकाळची ही विविध रूपं विलोभनीय आहेत.
मनातल्या सायंकाळी
लेखक : लक्ष्मण शंकर लोकरे
प्रकाशक : अनिल म्हमाने
मूल्य : १०० रुपये.
पृष्ठ : ८४.
रश्मी गोळे – response.lokprabha@expressindia.com

Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
| mangal gochar 2024 mars transit in aries these zodiac sign get more profit
एका वर्षानंतर मंगळ ग्रह करणार मेष राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना नशीब देईल साथ, धन-संपत्तीत होईल वाढ