lp58वाचनाची आवड असणाऱ्या बहुतेक सगळ्यांच्याच बाबतीत असं असतं की त्यांची एकदोन तरी अशी आवडती पुस्तकं असतात, जी कधीही उघडावीत आणि वाचावीत. मनाची मरगळ असो, द्विधा अवस्था असो किंवा उदासीनता असो, त्या पुस्तकाची दोनचार पानं वाचली की ती मरगळ आपोआप झटकली जाते. मन अगदी ताजंतवानं होतं. आपल्या आसपासच्या जगाशी आपलं काहीतरी नातं आहे, याची सखोल जाणीव होते आणि जगण्याच्या लढाईला सज्ज होण्यासाठी नवी उमेद मिळते.
अशा निखळ आनंद देणाऱ्या पुस्तकांच्या यादीत आता भर पडली आहे ती संदेश कुलकर्णी यांच्या ‘माँटुकले दिवस’ या पुस्तकाची. लहान मुलांच्या भावविश्वात आपल्याला ओढून नेणारं हे पुस्तक निखळ आनंददायक आहे.
आपल्या घरीदारी, शेजारीपाजारी असलेल्या लहान मुलांच्या बाललीलांनी आपण खूपदा खळखळून हसतो. त्याच्या बोबडय़ा बोलाचं कुणालाही कौतुक वाटतं. त्याचे खेळ, त्याचं कल्पनाविश्व हे सगळंच पुन:पुन्हा मोहात पाडणारं, त्याच्याकडे खेचून घेणारं असतं. लहान मुलाला वाटणारं प्रत्येक गोष्टीचं कुतूहल, त्याची ती निरागसता वय वाढताना आपण गमावलेली असते, म्हणूनच की काय ती ज्याच्याकडे आहे, त्याची आपल्याला गंमत वाटत असते. आपल्याकडे नसलेल्या आणि त्याच्याकडे असलेल्या त्या कोवळिकीतून आपल्याला अपार आनंद मिळत असतो, एक अनामिक ऊर्जा मिळत असते. पण त्या सगळ्याचं कुणी पुस्तक लिहीत नाही. नेमकं तेच संदेश कुलकर्णी यांनी केलं आहे. आणि त्यांचा हा प्रयोग अफलातून आहे.
‘माँटुकले दिवस’ हे पुस्तक म्हणजे तीन वर्षांचा माँटी आणि एकोणचाळीस वर्षांचा लेखक संदेश या दोघांमधल्या निखळ नात्याचा झुळझुळ झरा आहे. असा माँटी, सिद्धी आणि सिद्रा खरंतर आपल्याही आसपास असतात. बालपणाचा असा जिवंत आरसा आपल्यालाही कुणाच्या ना कुणाच्या रूपात अनुभवायला मिळालेला असतो. पण ते आपले त्या त्या क्षणांचे, तेवढय़ापुरतेच विसावे असतात. संदेशने मात्र त्याच्या वाटय़ाला आलेला हा माँटीरूपी झरा कागदावर उतरवून अवघी निरागसताच शब्दबद्ध केली आहे.
लहान मुलं मेक बिलिव्हच्या विश्वात जगत असतात. त्यांच्या हातातल्या रुमालाचं एका क्षणी विमानही होऊ शकतं आणि दुसऱ्या क्षणी समुद्रही होऊ शकतो. त्यांनी बघितलेलं, अनुभवलेलं त्यांच्या कल्पनाविश्वात मॅजिकल रिअलिझम बनून जातं. म्हणूनच माँटीच्या विश्वातही जिन्याच्या पायऱ्यांची ट्रेन होते आणि त्या ट्रेनने तो अगदी अंटाक्र्टिकापर्यंत प्रवास करून, पेंग्विनला भेटून येतो. दुसऱ्या क्षणी जिन्यातल्या भिंतीवरच्या डागाची खिडकी होते. त्या खिडकीतून उतरून तो सिंहाशी खेळून येतो. देव, राक्षस, हनुमान, कृष्ण, जंगल असले खेळ खेळतो. एसीचा रिकामा बॉक्स त्याचं घरं होतं. संदेशच्या कॉम्प्युटरवर बसून गंभीर चेहऱ्याने की बोर्ड बडवत मी काम करतोय असं तो सांगतो.
चल खेळूया असं म्हटल्यावर काम आहे हे उत्तर त्याला मिळतं. तेव्हा काम कशाला हा माँटीचा प्रश्न असतो. त्याला संदेश जेव्हा समजावून सांगतो की काम केलं नाही तर मला पैसे मिळणार नाही, पैसे मिळाले नाही तर मग मी खाणार काय, यावर माँटी निरागसपणे विचारतो, तू पैसे खातोस का?
सगळ्या लहान मुलांप्रमाणे माँटीलाही घडय़ाळ घालायला आवडतं. किती वाजले असं विचारलं की तो कधीही पाच असंच उत्तर देतो. तुला घडय़ाळ कशाला पाहिजे असं विचारल्यावर तो सांगतो की घडय़ाळ घातलं नाही तर फिर मेरे पास टाइम कैसे होगा? सिलेंडर असं ओरडत येणारा माणूस सिलेंडर आणतो. त्यामुळे चुहेवाला असं ओरडत येणारा माणूस उंदीर आणतो असं त्याला अतिशय निरागसपणे वाटतं. कावळ्यापासून सिलेंडरवाल्यापर्यंत त्याच्या आसपासच्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला कमालीचं कुतूहल आहे. त्याच्या मते क्रेन येते आणि रस्त्यावरचे खड्डे घेऊन जाते. संदेशचं काम संपलं की त्याच्याशी खेळता येईल म्हणून तो संदेशला ‘काम संपवलंस तर तुला चॉकोलेट मिळेल’ असंही आमीष दाखवतो.
माँटी त्याच्या जगाचा हिरो असताना मध्येच त्याच्या मजल्यावरच्या त्याच्या विश्वात सिद्धी आणि स्रिडा या त्याच्याहून थोडय़ाशा मोठय़ा मुली येतात. त्या माँटीच्या फ्रेण्ड्स बनतात. हे तिन्ही फ्रेण्ड्स घटकेत भांडतात तर घटकेत एक होतात. एरवी संदेशबरोबर मारामाऱ्यांचे खेळ खेळणाऱ्या माँटीला आता मुलींमुळे वेगळेच खेळ खेळावे लागतात. आणि या दोन चिमुरडय़ासुद्धा संदेशशी ‘तू माँटीवर जास्त प्रेम करतोस, आमच्यावर कमी’ असं बिनधास्त भांडायला कमी करत नाहीत. या सगळ्यातून मुलींचं वाढणं आणि मुलांचं वाढणं यातला गमतीशीर फरक आपोआपच अधोरेखित होतो.
ही तीन चिमुरडी मुलं आणि संदेश या चौघांचं मिळून एक वेगळंच जग आहे. या मुलांबरोबर संदेशचा नुसता चांगला टाइमपास होत नाही तर त्याला त्याच्या विश्वातल्या प्रश्नांची उत्तरंही मिळतात. कधीकधी त्याच्या कामातल्या तात्कालिक अडचणींवर मार्गही सापडतात. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पलीकडे जाणारा एक निखळ आनंद त्याला या मुलांच्या सहवासात मिळतो.
माँटीनं संदेशशी बरोबरीच्या नात्याने केलेली मैत्री, त्या मैत्रीतलं शेअिरग, भांडणं, हक्काच्या मागण्या हे सगळं अतिशय लोभस आहे. प्रकाश नारायण संतांच्या लंपनइतकाच संदेशचा हा माँटी मराठी वाचकांचा कायमचा लाडका होऊन राहणार आहे.
माँटुकले दिवस
लेखक : संदेश कुलकर्णी
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
मूल्य : १५० रुपये
पृष्ठे : १३४.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com