आधुनिकीकरणाच्या हव्यासात शहरात उभारलेल्या ‘स्कायस्क्रेपर्स’च्या पायाखाली भविष्यात काय काय दबून नि काय काय टिकून राहू शकतं, याचा थेट वेध तहसीन युचेल यांनी ‘स्कायस्क्रेपर्स’ या आपल्या कादंबरीमध्ये घेतलाय.

साहित्यात नोबेल पुरस्कार मिळवणारे तुर्की लेखक ओरहान पामुक यांच्याव्यतिरिक्त इतर तुर्की साहित्यिक, त्यांचं लेखन यांचा परिचय आपल्याला नाही. प्रारंभी अपरिचित वाटणारी ही संस्कृती एका आंतरिक धाग्यानं भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे. तिथलं संगीत, त्या भाषेतले काही शब्द, तिथली कुटुंबव्यवस्था नि समजुती, रूढी-परंपरा, कौटुंबिक नातेसंबंध हे भारतीय संस्कृतीला खूपच जवळचे वाटतात. तुर्कस्तान हा युरोप नि आशिया खंडाना जोडणारा देश. ग्रीक, पार्शियन, आर्मेनियन, बायझेंटाईन, ऑटोमनादी विविध राजवटींच्या सत्तांतरांचा इतिहास तुर्कस्तानला आहे. त्याचं विविधांगी प्रतिबिंब अहमत हामदी तानपिनार, हकन गुंदे, ओया बाय्दोर आदींच्या अनेक तुर्की कादंबरीकारांच्या लिखाणात दिसतं.

तुर्की भाषेतील तहसीन युचेल या लोकप्रिय कादंबरीकारानं ‘स्कायस्क्रॅपर्स’ मधून २०७३ मधल्या तुर्कस्तानाचं चित्रण अतिशय ताकदीनं उभं केलंय. युरोपियन राजकारण, तुर्की समाजव्यवस्था, जागतिकीकरण आणि खासगीकरणाचा झपाटलेला वेग या भल्यामोठय़ा विस्तारलेल्या वर्तुळाचा नेमका छेद घेणाऱ्या या कादंबरीचा अनुवाद शर्मिला फडके यांनी केलाय. शहरातल्या ‘स्कायस्क्रेपर्स’पैकी एकीवर शहरातल्या नामांकित वकिलांत गणना होणाऱ्या कान तेझकान या नायकाला अर्थातच केंद्रस्थानी ठेवून त्याच्याभोवती या कादंबरीचं कथानक फिरतं. एका परीनं कानचं व्यक्तिमत्त्व आणि ‘स्कायस्क्रेपर्स’च्या उभारणीसाठी केलेल्या धडपडीत शहराचं बदलू पाहणारं व्यक्तिमत्त्व असा दुहेरी गोफ या कथानकात विणला गेलाय. त्याला जोड दिली गेलेय तेमेल दिकेरच्या स्वप्नातल्या शहराची उभारणीची. दिकेरच्या आईसारखाच तोंडावळा असणाऱ्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याबद्दलची त्याची असोशी, रिझा कोच आणि वारोल कोर्कमाझची विचारसरणी, साबरी सेरेनची समतोल राखण्याची वृत्ती आणि गुल तेझकानची एका परीनं आपण साऱ्या वाचकांसारखीच भासणारी रेखाटलेली व्यक्तिरेखा. शहरातल्या व्यवस्थेसमोर ठामपणं उभं राहतात ते हिकमत सिरिन आणि त्या व्यवस्थेचं एक प्रतीक ठरतात मेवलुत दोगान. त्याखेरीज देशाची न्यायव्यवस्था, सरकारी कारभारापासून ते जागतिकीकरण, खासगीकरण, युरोपियन राजकारण आणि तुर्की समाजव्यवस्था असा मोठा अवकाश टप्प्याटप्प्यानं उलगडत जातो. काही ऐतिहासिक आणि भौगोलिक संदर्भ बदलून हे कथानक पाहिलं तर जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही घडू शकतं, असा त्याचा आकृतिबंध आहे.

कान तेझकानसारख्या वकिलानं पाहिलेलं स्वप्न, त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्यानं सहकाऱ्याच्या साहाय्यानं केलेला पाठपुरावा, त्याच्या भूतकाळाच्या अधूनमधून पडणाऱ्या खऱ्याखोटय़ा सावल्या, त्याच्या जिवलगांची तगमग, त्याच्या शिष्यानं त्याच्यासमोर मांडलेलं उघडंवाघडं सत्य आणि या साऱ्यांचा परिणामवश कानच्या मनोवस्थेचा घेतलेला वेध मुळातूनच वाचण्यासारखा आहे. रेझानं रेखाटलेलं बहिष्कृताचं जिणं आणि कानच्या वर्तुळातल्या धनदांडग्यांचं जगणं या विरोधाभासाकडं आपसूकच लक्ष वेधलं जातं. एक झोका सकारात्मकतेचा तर पुढला नकाराचा, त्यापुढला धक्कादायी नि त्यानंतरचा झोका भयानं झाकोळून टाकणारा ठरतो. या सगळ्यात सामान्यांची होणारी दोलायमान परिस्थिती आणि क्रांतीतल्या आशा-निराशेचे हिंदोळे वाचकालाही हलवतात.

कादंबरीच्या सुरुवातीपासून ते अखेरीस आपल्याला काय वाचायला मिळणार, याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. कथानकातील पात्रांच्या नावांपासून ते त्यांच्या संबंधांतल्या ताण्याबाण्यांपर्यंत कितीतरी बारीकसारीक गोष्टी लक्षवेधी ठरतात. उदाहरणार्थ- सगळ्यांचे विचार ऐकणारा नायक ‘कान’, व्यवस्थेशी दोन हात करणारा ‘हिकमत’ आणि व्यवस्थेचं प्रतीक ठरणारा ‘मेवलुत’ आदी नावं यथार्थ वाटतात. स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी हिकमतच्या घराचा घेतला गेलेला घास, त्याच्या घरातल्या फोटोत दिसणाऱ्या दोन मुलांच्या अस्तित्वाचा उल्लेख, त्या घरासाठी कानची चाललेली धडपडणं, स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी दडपण आणणारं नाटय़ आणि कानच्या मनोव्यवस्थेच्या वर्णनांमध्ये वाचकाला गवसू बघणारा आपल्याच मनाचा थांग.. असे काही प्रसंग या कादंबरीची बलस्थानं मानता येतील. आता अमुक प्रसंग येईल किंवा अमुक पात्र असं वागेल, अशा आपल्या अंदाजांना ठोकरून प्रत्येक वेळी निराळीच कलाटणी मिळते. त्यामुळं कादंबरीतल्या पात्रांच्या जयविजयाच्या नि सुखदु:खाच्या झुल्यांवर झुलता झुलता, येता काळ जगाला कोणत्या मार्गानं स्वप्नपूर्तीच्या दिशेनं घेऊन जाईल, ते आपल्याला ठरवता येईल का की, ते आपल्याला कळणारच नाही नि काळाची पावलं ओळखण्यात आपण मागं पडू.. याच अनिश्चिततेच्या झुल्यावर आपण अस्वस्थपणं झुलत राहतो.
स्कायस्क्रेपर्स, तहसीन युचेल, अनुवाद : शर्मिला फडके, प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन, पृष्ठे : २८७, मुल्य : रु. ४५०/-
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com