आज आपण जगभरातील पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतो. तिथल्या खाद्य संकल्पनाही आपण राबवू लागलोय. ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, डिनर, फाइव्ह कोर्स मिल असे शब्द आपल्यालाही जवळचे वाटू लागले आहेत. भारतातील विविध राज्यांतील खाद्यपदार्थाप्रमाणेच आपल्याला जगभरातील पदार्थ हवेहवेसे वाटू लागले आहेत. याच संकल्पनांवर आधारित आहे उषा पुरोहित याचे ‘ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय- टी’

आपल्याकडे न्याहारी परिचयाची होती. शहरांमध्ये न्याहारीचा नाश्ता झाला आणि ब्रेकफास्ट झाला. न्याहारीच्या पदार्थामध्ये तोच तोच पणा यायला लागला. त्यात नावीन्य हवे असे वाटू लागले. हेच नावीन्य ब्रेकफास्ट विभागात उषा पुरोहित देतात. विविध पेयं, पाश्चात्य ब्रेकफास्ट, पंजाबी, उत्तर प्रदेशी, दाक्षिणात्य, गुजराती आणि महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट असे विभाग करून त्या त्या प्रदेशातील खास पदार्थाच्या रेसिपीज येथे दिल्या आहेत.

ब्रंच संकल्पनेतील विविध मेन्यू नक्कीच जठराग्नी प्रज्वलित करतील असेच आहे. पंजाबी, गुजराती, दाक्षिणात्य मेन्यू बरोबरच इटालियन, चायनिज, थाई, लेबनिज मेन्यू आपल्या रसना नक्कीच तृप्त करतील. उषा पुरोहित यांनी यात शाकाहारी किंवा मांसाहारी असे काही वेगळे विभाग केलेले नाहीत. तर त्या त्या ठिकाणची खासियत देण्याचा प्रयत्न केला आहे. हाय-टी प्रकारात त्यांनी काय सव्‍‌र्ह करावे आणि काय सव्‍‌र्ह करू नये याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यासाठीची टेबल सजावट, क्रॉकरी कटलरी यांबाबतही सांगितले आहे.

आजच्या तरुण पिढीबरोबरच नावीन्याची आवड असणाऱ्यांना नक्की आवडतील असे खाद्य पदार्थ आणि त्यांच्या रेसिपीज यात त्यांनी दिल्या आहेत. रेसिपीजचे पुस्तक असूनही छायाचित्रांचा कमी वापर मात्र खटकतो.
ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी, लेखिका – उषा पुरोहित, प्रकाशक – रोहन प्रकाशन, मूल्य – २५०, पृष्ठसंख्या – १९०
रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com