भारतातील मधुमेहींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढतच आहे. भविष्यात मधुमेह हा आपल्या देशातील आरोग्यावर, अर्थ व्यवस्थेवर परिणाम करणारा आजार असेल यात शंकाच नाही. योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले तर हा आजार आटोक्यात ठेवणे सहज शक्य आहे. ते कसे याचा मंत्र मिळतो, डॉ. प्रदीप तळवलकर लिखित ‘मधुमेह खुशीत’ या पुस्तकातून.

मधुमेह हा आता सगळ्यांनाच माहीत असलेला शब्द. मधुमेह झाला की त्याबाबत रुग्णांमध्ये अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. अगदी सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा. हेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न डॉ. तळवलकर यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी अगदी मधुमेह म्हणजे नक्की काय या प्राथमिक माहितीपासूनच पुस्तकाला प्रारंभ केला आहे. मधुमेहाचा इतिहास, सध्याची जागतिक स्थिती याची माहिती देऊन त्याची गंभीरता स्पष्ट केली आहे. मधुमेहाच्या चाचण्यांविषयी अनेकदा संभ्रमावस्था आढळते. ती दूर करताना डॉक्टरांनी कोणी, कधी आणि कोणत्या चाचण्या कराव्यात, त्यामागची कारणे सांगितली आहेत. ज्या व्यक्तीला मधुमेहाचा निश्चित कौटुंबिक इतिहास आहे अशा व्यक्तींनी वयाच्या विसाव्या वर्षांनंतरच मधुमेहाची प्रथम चाचणी करून घ्यावी असा मोलाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच केवळ चाचण्याच नाही तर त्यांचे प्रमाण काय असावे, त्यामागील शास्त्रीय माहितीही त्यांनी काहीही हातचे न राखता लिहिली आहे. मधुमेहाचे प्रकार, ते कोणाला कसे होऊ शकतात, त्याची लक्षणे, कारणे दिली आहेत. मधुमेह होण्याची कारणे नीट लक्षात घेतली तर त्याला टाळणे कसे सोपे आहे तेही त्यांनी सांगितले आहे.

मधुमेहासाठी आहाराचे आणि व्यायामाचे व्यवस्थापन किती गरजेचे आहे, हे डॉक्टरांनी वेळोवेळी अधोरेखित केले आहे. त्यासाठी त्यांनी तक्त्यांचा सुयोग्य असा वापर केला आहे, जेणे करून वाचकाला ते समजणे सोपे जाईल आणि स्वतचे आहार नियोजन करणेही.

मधुमेहींनी कोणता व्यायाम करायला हवा, किती वेळ करायला हवा, कोणता टाळायला हवा, त्यामागे कोणते कारण आहे हेही मांडले आहे. मधुमेहावरील औषधे, त्यामधील घटक, इन्सुलिनचे महत्त्व याची माहिती सगळ्यांनाच समजेल अशा सोप्या शब्दांत मांडली आहे. मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंतीच्या व्याधी सांगून डॉक्टरांनी रुग्णांना सावध केले आहे. मधुमेहींसाठी दात, डोळे, पावले यांची काळजी किती महत्त्वाची आहे हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एकंदरच ज्यांना मधुमेह झाला आहे अशांसाठी तर हे पुस्तक संग्रही ठेवावे असेच आहे, परंतु ज्यांना मधुमेह नाही अशांनीही आपले ज्ञान वाढवण्यासाठी, गैरसमज दूर करण्यासाठी संग्रही ठेवावे असेच आहे. तसेच डॉ. प्रदीप तळवलकर यांचे विचार, त्यांचे ज्ञान, माहिती अनुवादक सुनीती जैन यांनी अगदी अचूक आणि परिणामकारक शब्दांत मांडले आहे.
मधुमेही खुशीत…, लेखक – डॉ. प्रदीप तळवलकर, अनुवाद – सुनीती जैन, प्रकाशक – रोहन प्रकाशन, मूल्य – ३०० रुपये, पृष्ठ संख्या – २५४
रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com