लहान मुलांसाठीच्या ‘टॉनिक’ या मासिकाचे संपादक मानकरकाका यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अनेकांनी लिहिेलेल्या लेखांचे पुस्तक डॉ. वीणा सानेकर यांनी संपादित केले आहे.

‘टॉनिक’कार मानकरकाका म्हणजे लहान मुलांचे बौद्धिक डॉक्टर. ‘टॉनिक’च्या दिवाळी अंकांना ३५ वर्षांत मिळालेली ५६ पारितोषिके, चंद्रकांत खोत, दादा गावकर यांच्या मार्गदर्शनाने ६० वर्षे केलेली विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची सेवा, शेवटच्या क्षणापर्यंत चितारलेली  लाखभर स्केचेस, ‘टॉनिक’ने सुदृढ केलेली लेखक व चित्रकारांची नवी पिढी हे काकांचे कार्य ‘ऊर्जा’ देणारे आहे. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे’ या साने गुरुजींच्या मार्गावर मानकरकाकांनी आपला प्रवास सुरू केला. या जीवनप्रवासात हजारो माणसे नकळत त्यांच्याशी जोडली गेली. ‘एक संकल्पपुरुष’ म्हणून काकांची ओळख होती. त्यांनी अनेक अशक्य संकल्प सिद्धीस नेले. मोठी स्वप्ने, प्रबळ  इच्छाशक्ती, उदात्त अंत:करण, कामांचं झपाटलेपण यांच्या जोरावर काकांनी मोठमोठय़ा कामांची मुहूर्तमेढ रोवली. ‘लहान मुलांना योग्य वेळी चांगले संस्कार दिले तरच पुढची पिढी चांगली घडेल’ असे म्हणत काका मुलांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिले. काकांची ‘केल्याने होत आहे रे’ आणि ‘देवचार’ ह पुस्तके लोकांपर्यंत पोहोचावी, कर्तबगार विद्यार्थी घडवणारा हा ‘महागुरू’ नव्या पिढीला कळावा यासाठी मानकरकाकांची मानसकन्या       डॉ. वीणा सानेकर यांनी काका गेल्यावर ‘मानकरकाका :  कॅनव्हास पलीकडचा माणूस’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

पुस्तकात वणव्यांशी झुंजणाऱ्या काकांची ओळख कवी चंद्रशेखर सानेकर यांच्या काव्याने केली आहे. उपेक्षित बालसाहित्याला तसंच मुलांमधील चित्रचळवळीला उभारणी देण्याचे काम मानकरकाकांनी केले. ‘टॉनिक बालनुक्कड’ चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना त्यांचे विजेते चित्र ट्रॉफीवर लॅमिनेट करून देणे, टॉनिकच्या दिवाळी अंकात पुरस्कारविजेते चित्र विद्यार्थ्यांच्या फोटोसह छापणे असे प्रयोग मानकरकाकांनी सुरू केले.

lp36कोणत्याही सामाजिक कामांच्या उभारणीत प्रत्यक्ष भेटीला किती महत्त्व आहे हे काकांनी दाखवून दिले. प्रवासातील वेळ जवळपास लाखभर रेखाचित्रांसाठी वापरणाऱ्या त्यांच्यातल्या सच्च्या चित्रकाराची ओळख करून पुस्तकातून होते. काकांना वाचनाची आवड होती. कोणीही भेटले की तुम्ही काय नवीन वाचताय, हे ते आवर्जून विचारायचे. ‘वाचेल तो वाचेल!’ या मराठी भाषेच्या वाचन चळवळीचे काका खरे कार्यकर्ते होते. ‘टॉनिक’ सारखा दर्जेदार दिवाळी अंक काढताना मानकरकाकांना तोटाही सहन करावा लागला. अशा वेळी कथाकाकूंनी म्हणजेच त्यांच्या पत्नीने आपले दागिने गहाण ठेवून ‘टॉनिक’ला नवसंजीवनी दिली.

कथा मानकर, डॉ. वीणा सानेकर, डॉ. विजया वाड, दादा गावकर, चित्रकार शि. द. फडणीस, विकास सबनीस, अच्युत पालव, विजयराज बोधनकर, राज कांबळे, प्रदीप म्हापसेकर, अजित सिंग, लेखक  ह. शि. खरात, बबन धनावडे, सुमन फडके, निशिगंधा वाड अशा नामांकितांचे अनुभव ‘मानकरकाका’ या पुस्तकात वाचायला मिळतात.

lp37प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे काका अभ्यासू बालचित्रकाराला भेट म्हणून देत. शि. द. फडणीस यांची व्यंगचित्रे काकांनी अनेक वर्षे ‘टॉनिक’मध्ये आवर्जून घेतली. ‘टॉनिक २०१५’चा दिवाळी अंक ‘जपान’वर होता. त्यासाठी काकांनी शि. द. फडणीस यांना पुलंच्या ‘पूर्वरंग’ पुस्तकात जपानी माणसांवर काढलेल्या चित्रांची आठवण करून दिली. ती चित्रं रंगीत स्वरूपात त्यांनी मुखपृष्ठावर छापली. काकांच्या अशा तळमळीला अनेकांची दाद मिळायची.

साहित्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे हा काकांचा आवडता छंद होता. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाची विवेकानंद व्याख्यानमालाही त्यांनी कधीच चुकवली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. होमी भाभा, जोतिबा फुले, बाळासाहेब ठाकरे यांची रंगीत व्यक्तिचित्रे या पुस्तकात दिली आहेत. गंगाधर गाडगीळ, दुर्गा भागवत, जयंत साळगावकर, सिंधुताई सपकाळ यांची कार्यक्रमात काढलेली रेखाचित्रे पुस्तकाची शोभा वाढवतात. काकांनी विविध संस्थांसाठी नटसम्राट, रायगडाला जेव्हा जाग येते, दुरितांचे तिमिर जावो, झुंझारराव अशी नाटके बसवून त्यात स्वत:ही काम केले.

मानकरकाकांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस दर महिन्याच्या चार तारखेला सिनेमा पाहून व पुस्तक खरेदी करून साजरा केला. वर्षभरात ३६५ लोकांना भेटून त्यांनी रेखाचित्रे काढण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला. मुलांसाठी दैनिक व साप्ताहिक काढून मुलांना वाचनाची आवड व्हावी यासाठी त्यांनी अनेक शाळांमध्ये पायपीट केली.

‘भायखळ्याचा व्हॅन गॉग’ हा प्रदीप म्हापसेकर यांचा ‘मानकरकाका’ पुस्तकातील लेख वाचनीय झाला आहे. बबन धनावडे यांची ‘अविश्रांत धडपड विसावली’ ची गाथा, दादा गावकर यांचा ‘कामे अंगावर घेणारा कृष्णा’चा अनुभव, विकास सबनीस यांनी शब्दात रेखाटलेला ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणारा माणूस’ हा व्यक्तिवेध, प्रतिकूल परिस्थितीतून मात करणाऱ्या बबन गोसावीला डॉक्टर करणारे मानकरकाका, ‘सारी धडपड झाली मुकी’ या वेदना सांगणाऱ्या डॉ. विजया वाड, काकांना ‘झोळी’ भेट देणाऱ्या मंदाकिनीताई, निशिगंधा वाडच्या भविष्याची पायाभरणी करणारे मानकरकाका या पुस्तकातून अनुभवायला मिळतात.

काका विसरभोळे होते. ते आरामदायी जीवन व अमाप पैसा कमवायला विसरले होते. संकटांवर मात करून त्यांनी असाध्य गोष्टी शक्य करून दाखविल्या. हा वारसा मानसकन्या वीणा सानेकर यांनी उचलला.  त्यांनी अनेक अडचणींवर मात करत काकांच्या बालनुक्कड चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस समारंभात पुस्तक प्रकाशन केले. काकांनी असे असंख्य शिलेदार घडविले आहेत.

सुधीर खेडकर, श्रीनिवास खळे यांनी काढलेली काकांची चित्रे मनाला भावतात. काकांच्या दोन खांद्यावरील झोळी पाहून अनेक जण मदतीचा हात द्यायचे. तेव्हा काका हसत म्हणायचे, ‘ही झोळी खांद्यावर घेणं सोपं नाही?’ ते खरंच होतं. काकांच्या कामाची व्याप्ती, त्यांच्या वाटचालीचा लेखाजोखा ‘मानकरकाका’ पुस्तकात पाहायला मिळतो. राज कांबळेचे ‘आपलं टॉनिक संपलं’ हे मलपृष्ठ मन हेलावते. बाळ राणे, स्वाती गावडे, ईशा सानेकर, राजेश दाभोळकर, आनंद खेडकर, प्रा. प्रतिभा सराफ, सी. पु. वालावकर, सुनीता नागपूरकर यांचे मानकरकाकांसोबतचा आनंदप्रवास येथे वाचायला मिळतात.

पायांना चाकं लावून फिरणारे मानकरकाका स्वर्गातही स्वस्थ बसणार नाहीत, तेथेही ते ‘टॉनिक’ चालू करतील, बालविशेषांक पाठवतील असा आशावाद त्यांच्या शिलेदारांना वाटतो. काकांच्या कार्याचे विस्मरण होऊ नये हेच या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. ‘मानकरकाका’ या पुस्तकाच्या विक्रीच्या रकमेचा विनियोग बालनुक्कड चित्रकला स्पर्धेच्या नव्या कामांसाठी करण्यात येणार आहे. काकांच्या कामांची नवी परिमाणे शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकाने केला आहे.

‘मानकरकाका : कॅनव्हासपलीकडचा माणूस’, संपादन – डॉ. वीणा सानेकर, राजेश दाभोळकर, प्रकाशक – फुलराणी प्रकाशन, बोरिवली (पूर्व), मुंबई. पृष्ठे – ७८, किंमत – १५०/- रुपये.
प्रशांत मानकर –