पैसा असताना आणि नसताना मानवी स्वभावाच्या दोन टोकांचं दर्शन बहुतांश वेळा घडतं. मानवी संबंधांमध्ये पैशाला महत्त्व नाही अशी माणसं क्वचितच आढळतात. पैसा आला की माणूस बदलताना दिसतो, त्याचे पूर्वी न पाहिलेले रंगढंग दिसायला लागतात. पैशामुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं. हेच ‘परीघ’ कादंबरीमध्ये सुधा मूर्ती यांनी मांडलं आहे.

कर्नाटकातल्या हुबळी शहराजवळ असणाऱ्या आळद हळ्ळी या गावची मुलगी मृदुला. गावच्या निरागसतेने आणि सौंदर्याने नटलेली. जीवनाबद्दल अतीव उत्साह आणि प्रत्येक बाबतीत पराकोटीची आसक्ती असणारी मृदुला. वैद्यकीय शिक्षण घेण्याची आर्थिक आणि बौद्धिक कुवत असूनही केवळ शिकवायला आवडतं म्हणून ती शिक्षिका झाली होती.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

मैत्रिणीच्या लग्नात तिची ओळख कर्नाटकातच शिकून मुंबईला नोकरी करत असलेल्या डॉक्टर संजयशी होते. संजयला मृदुला आवडते पण तो काही आपल्या भावनांना समजू शकत नाही. शिवाय सगळ्याच दृष्टीने त्याच्यापेक्षा वरचढ असणारी मृदुला आपला स्वीकार का करेल असे विचार त्याच्या मनात येतात. योगायोगानं मृदुलाचं मुंबईला जाणं होतं आणि तिथे तिची गाठ पुन्हा संजयशी पडते. इथे मात्र दोघांना परस्परांविषयी आपल्या भावना नक्की काय आहेत हे समजतं. पुढे त्यांचं लग्न होतं आणि ते बंगळुरूला स्थायिक होतात. सुरुवातीपासून दोघांचे स्वभाव एकमेकांना पूरक आहेत हे जाणवतं. दोघांची कष्ट करण्याची तयारी असते. संजयला उच्च शिक्षण घेताना, त्याच्या सगळ्याच महत्त्वाकांक्षेत मृदुला समरसून साहाय्य करत असते.

सरकारी नोकरी करत असताना संजयला पदोपदी त्याच्या प्रामाणिकपणाचं ‘फळ’ मिळत असतं. त्याने तो दिवसेंदिवस हताश होत जातो. अशातच नोकरी सोडून काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय तो घेतो. मृदुला कायम त्याच्या पाठीशी असते. तिचं एकच म्हणणं असतं, ‘तुम्ही न्यायाने, नैतिकतेने आणि सरळ मार्गाने पैसा मिळवत असाल, तर मी नेहमीच तुमच्या सोबत असेन. मी केवळ नीतीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशांसाठी कितीही कष्ट घ्यायला तयार आहे.’ तिचा संजयवर पूर्ण विश्वास असतो की तो आजपर्यंत ज्याप्रमाणे न्यायाने वागत आला आहे तसाच तो पुढेही वागेल. मात्र, पैसा हाती येऊ लागताच संजय बदलत जातो. ज्याप्रमाणे त्याचे गुण पैशांमुळे समोर यायला लागतात त्याचप्रमाणे त्याचे अवगुणही समोर यायला लागतात. त्यात तो मृदुलाची फसवणूक करायला लागतो. मृदुलेच्या तत्त्वांची त्याला चीड यायला लागते. तो सतत तिची तुलना दुसऱ्यांशी करून तिची अवहेलना करू लागतो. आपली फसवणूक झाल्याचं सरळमार्गी मृदुलाला समजतं तेव्हा मात्र ती कोलमडून पडते. संजयच्या वागण्याने मनोमन होरपळून जाते.

फसवणुकीमुळे मृदुला सर्व बाजूंनी सगळ्या घटनांचा विचार करते तेव्हा तिला पैसा माणसाला कसा बदलायला लावतो याचं दर्शन घडतं. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर तिला समजावताना म्हणतात, ‘पैसा आला की तुमच्यामधले गुण आणि अवगुण दोन्ही बाहेर येतात. पैसा नसताना दडपलेले अवगुण पैसा आल्यावर बाहेर येतात. त्याअर्थी पैसा हा आपल्याल बदलतो. म्हणूनच कंजूस माणूस श्रीमंत झाला की लोभी होतो. तो आणखी आणखी जमीनजुमल्याची खरेदी करतो. स्वार्थी माणूस विलासी होतो. उदार माणूस दानी होतो. ज्यांना पैशाचा मोहच नाही, त्यांना पैसा आहे आणि नाही, यात काहीही परक दिसत नाही. पैशांमुळे खऱ्याखुऱ्या मानवी संबंधांचं दर्शन घडतं.’ जे मृदुलेला घडलेलं असतं. त्यातूनच मृदुला एक ठाम निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करते.

सुधा मूर्ती यांच्या एकूणच सगळ्या पुस्तकात मानवी स्वभावाच्या कंगोऱ्यांचं दर्शन होत असतं. असं असलं तरी त्यांच्या पुस्तकामध्ये मानवी स्वभावातल्या नकारात्मकतेवर सकारात्मकता नेहमीच विजय मिळवताना आढळते. आयुष्यात कितीही वादळांना तोंड द्यावं लागलं तरी शेवट नेहमी चांगलाच होत असतो, असा संदेश त्यांच्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळेच याही कांदबरीचा शेवट गोडच आहे.

पैशांमुळे संजयमधील बदल पाहिला की आपल्या आजूबाजूला असणारी अनेक उदाहरणं डोळ्यासमोर यायला लागतात. एकंदरीत वैद्यकीय व्यवसायातलं सत्य लक्षात येतं. सुधा मूर्ती यांनी वैद्यकीय व्यवसायासह आपल्याकडील बदलत जाणारी परिस्थिती इतक्या नेटक्या शब्दांत मांडली आहे की त्यातील दाहकता जाणवल्याशिवाय राहात नाही. लक्ष्मी दर्शनापूर्वी ज्या गोष्टींचा माणसाला तिटकारा असतो त्याच गोष्टी तो लक्ष्मीप्राप्तीनंतर किती सहजतेनं करतो याचं दर्शन उत्तम रीतीने घडवलं आहे. कादंबरीत मृदुलेचे आई-वडील, भाऊ बहीण, अलेक्स-अनिता, संजयची आई, तिचे विचार, त्याची बहीण तिचा नवरा त्याचप्रमाणे त्यांचे नातेवाईक यांचं स्वभाव दर्शन घडतं. ही माणसं आणि त्यांचे स्वभाव म्हणजे समाजाचे काळे, पांढरे अन् करडे रंग समोर येतात. त्या रंगांची पाश्र्वभूमी आणि बदलत्या रंगांची कारणं आपल्याला लेखिकेनं नकळत समजावून दिली आहेत.

‘परीघ’ कादंबरीचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे. आपण अनुवाद वाचतो आहे असं कुठेही जाणवत नाही. पुस्तकातून मिळतो तो उत्तम भाषा वाचनाचा आनंद.

परीघ, मूळ लेखिका : सुधा मूर्ती, अनुवाद : उमा कुलकर्णी,   मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे : २२०, मूल्य : २०० रुपये.
रेश्मा भुजबळ – response.lokprabha@expressindia.com