एकूण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माणसाच्या बुद्धीने जी काही वळणं घेतली, त्यातून वेगवेगळ्या कला विकसित होत गेल्या. त्यातली एक महत्त्वाची कला म्हणजे नाटक. नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्या या नाटकाच्या वेडापायी मराठी रंगभूमीने एकेकाळी वैभवशाली दिवस बघितले आहेत. लेखन, अभिव्यक्ती या पातळीवरचे वेगवेगळे प्रयोग याच रंगभूमीवर साकारले गेले आहेत. त्यामुळे मराठी नाटकं, त्यांचे प्रयोग, नाटय़कलाकार हे विषय महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत असतात.

मुंबईची गोष्ट मात्र थोडी वेगळी आहे. मुंबई हे एकतर कॉस्मोपोलिटन शहर. आंतरराष्ट्रीय नकाशावरही त्याला ठळक स्थान आहे. त्यामुळे मुंबईतल्या नाटय़वर्तुळात केवळ मराठी तसंच अमराठीच  नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची नाटकंही सादर होत असतात. या नाटकांच्या प्रयोगांना चांगला प्रतिसादही मिळत असतो. पण काही अपवाद वगळता मराठी प्रेक्षक मात्र सहसा या वर्तुळापासून लांब असतो. त्याला या अमराठी तसंच आंतरराष्ट्रीय रंगभूमीबद्दल तसं फारसं काही माहीत नसतं. ही उणीव भरून काढली आहे प्रा. अविनाश कोल्हे यांच्या ‘रंगदेवतेचे आंग्लरूप-मुंबईतील अमराठी रंगभूमी’ या पुस्तकाने.

बुलढाण्यातील खामगाव, तिथून पुणे आणि मग मुंबई असा आयुष्याचा प्रवास करत आलेल्या अविनाश कोल्हे यांनी १९९२ मध्ये मुंबईत ‘तुम्हारी अमृता’चा प्रयोग बघितला. अर्थातच त्यांना तो प्रचंड आवडला आणि तेव्हापासून त्यांनी मुंबईत सादर होणारी अमराठी नाटकं बघायला, त्यांचं परीक्षण करायला सुरुवात केली. त्यातून त्यांनी आजवर जवळजवळ अडीचशे ते तीनशे अमराठी नाटकांची परीक्षणं केली आहेत. त्यातून निवडक ३२ परीक्षणांचं हे पुस्तक आहे.

मुंबईतल्या अमराठी रंगभूमीवर त्यांनी जागतिक पातळीवरची नाटकं बघितली. त्यात जशी शेक्सपीअर, बर्नार्ड शॉ, इब्सेन यांच्यासारख्या नाटककारांची नाटकं होती, तशीच महाभारत सादर करणारा पीटर ब्रुक, अमेरिक नाटककार जॉन पिलमेयर, रेगिनाल्ड रोझ, वुडी अ‍ॅलन, रशियन नाटककार एव्हगेनी श्वार्ट्झ, ब्रिटिश नाटककार डेनिस केली, इटालियन नाटककार दारिओ फो अशा आधुनिक काळातल्या नाटककारांच्या कलाकृतीही होत्या. त्यबरोबरच बादल सरकार, गिरीश कर्नाड, मोहन राकेश यांच्यासारख्या अमराठी, पण भारतीय अशा नाटककारांच्या कलाकृतीही त्यांना आस्वादता आल्या. या समृद्ध नाटय़विष्कारातून त्यांची स्वत:ची नाटय़जाणीव विकसित होत गेली. मराठी प्रेक्षकांना त्यांनी या सगळ्या जगाचा परिचय या पुस्तकातून करून दिला आहे.

पुस्तकाची सुरुवात होते ती ‘माय फेअर लेडी’ या नाटकाच्या प्रयोगापासून. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या ‘पिग्मॅलियन’वर आधारित हे नाटक. ‘पिग्मॅलियन’ या नाटकाचं नाव मराठी माणसाच्या कानावरून गेलेलं असतं ते पुलंनी रूपांतरित केलेल्या ‘ती फुलराणी’मुळे. माणूस स्वकर्तृत्वाने मोठा होऊ शकतो, जन्मत: कोणी श्रेष्ठ, कनिष्ठ नसतो, नीट ग्रूमिंग झालं तर रस्त्यावरची फुलं विकणारी तरुणीसुद्धा अगदी राजघराण्यातील तरुणीसारखीच सफाईदार भाषा बोलू शकते, तितकीच सफाईदार वागू शकते, हा मुद्दा ठसवण्यासाठी शॉने ‘पिग्मॅलियन लिहिले. त्याची भाषाशुद्धीचा विचार मांडणारी प्रस्तावना खूप गाजली. या प्रस्तावनेत शॉने नाटकाचा शेवट सुखान्त का होऊ शकत नाही, त्याचे विवेचन केले होते. हे नाटक प्रचंड गाजलं, पण शॉने केलेला शेवट खूपजणांना आवडला नव्हता. त्यापैकी अ‍ॅलन जे. लर्नर यांनी १९६० साली ‘पिग्मॅलियन’चा आधार घेऊन ‘माय फेअर लेडी’ ही दोन अंकी संगितिका लिहिली. ती खूप गाजली. तिच्यावरून आलेला याच नावाचा सिनेमाही खूप गाजला. आज लोकांना ‘पिग्मॅलियन’पेक्षाही ‘माय फेअर लेडी’च माहीत असतं. होसू वासुनया प्रॉडक्शनने मुंबईत केलेला या नाटकाचा देखणा प्रयोग बघून त्यावर प्रा. कोल्हे यांनी लिहिले आहे. त्यात नाटकाबरोबरच शॉसंदर्भातही चर्चा आहे.

इंग्लंडच्या फूट्सबार्न ट्रॅव्हलिंग थिएटर कंपनीने ग्रीक महाकवी होमरच्या ‘ओडिसी’चे जगभर प्रयोग केले. या कंपनीने १९९४ मध्ये भारतात येऊन केरळमधील चार नाटय़कलावंतांना निवडून त्यांच्याकडून ओडिसी बसवून घेतले आणि त्याचे भारतभर प्रयोग केले. मुंबईत हा भव्य प्रयोग ‘पृथ्वी थिएटर’मध्ये झाला. तो बघून त्यावर प्रा. कोल्हे यांनी लिहिले आहे. त्याशिवाय ब्रेख्तच्या कथांवर दिल्लीतील ग्रुपने सादर केलेली नाटके, एस. प्रॉडक्शनने मेरेलिन फेस्ट या नाटककाराचे ‘अ‍ॅक्ट्स ऑफ फेथ’, हॅट्स ऑफ प्रॉडक्शनचे ‘थँक्यू कोकिळा’, रेज प्रॉडक्शनने सादर केलेले ज़्‍ान गेर या अमेरिकी नाटककाराचे ‘सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन’, हिमा कला केंद्राने सादर केलेले ‘तबुला रासा’, मुंबईच्या अ‍ॅक्टिंग स्टुडिओ तसंच दिल्लीच्या नाटय़भारतीने सादर केलेले दारिओ फोचे ‘ओपन कपल’ अशा वेगवेगळ्या ३२ नाटकांची ओळख यात आहे.

मराठी नाटय़सृष्टीवर विकसित झालेल्या आपल्या नाटय़जाणिवांना हे पुस्तक एका वेगळ्याच विश्वात नेतं, एवढं मात्र खरं.
रंगदेवतेचे आंग्लरुप, मुंबईतील अमराठी रंगभूमी, प्रा. अविनाश कोल्हे, प्रकाशक-  लोकवाड्मय गृह, पृष्ठे- १४४, मूल्य- २५० रुपये
वैशाली चिटणीस – डोपामाइनचं तंत्र उलगडत शेवटी अतुल पांडे आणि उत्तरा यांच्यातील प्रेमकहाणीचं रहस्य या कथेच्या शेवटी समोर येतं.