खद्योतो द्योतते तावद् यवन्नोदयते शशी उदिते तु सहस्रांशौ न खद्योतो न चन्द्रमा:

चंद्राच्या अनुपस्थितीत काजवासुद्धा चमकतो, परंतु सूर्य उगवल्यावर काजवाच काय चंद्राचं अस्तित्वही जाणवत नाही. महान व्यक्तींच्या बाबतीतही असंच असतं. सूर्याचं महत्त्व याहून योग्य शब्दांत मांडणं कठीण आहे. सूर्याची महती वेदकाळापासून गायली जात आहे. त्यानंच सृष्टी निर्मिली आणि पोसली. तोच या चराचराच्या उत्पत्तिस्थितीचा आधार आहे. तो सर्वसाक्षी आहे.

mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

संजीवनी खेर यांनी लिहिलेल्या ‘सर्वसाक्षी’ या पुस्तकाच्या निमित्ताने सूर्याचं ऋण आठवलं. या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच अनाम ज्ञानसूर्याना अर्पण केलेली. हे पुस्तक वाचणं हा एक अनुभव आहे आणि दर्दी वाचकाने तो चुकवू नये.

भारतात सूर्य ही देवता तशी दुर्लक्षितच, तरीही ‘जळी-स्थळी’ आपलं अस्तित्व दाखवणारी. ३३ कोटी (प्रकारच्या) देवांमध्येही १२ आदित्य आहेतच! या ग्रंथप्रवासाची सुरुवातही अशीच होते. सहजच, गप्पा मारत, सूर्याला शोधत! भारताला सूर्यपूजा वावगी असं म्हणत असताना पहिल्या तीसेक पानांत लेखिकेनं सूर्यप्रतिमांची जंत्रीच दिली आहे. ते वाचतानाच चहूबाजूला सूर्याचं अस्तित्व जाणवू लागतं. लेखिका तिच्या या वेगळ्या प्रयत्नात भलतीच यशस्वी झाली आहे. सूर्यावर कोणी पुस्तक का लिहावं, या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि जिज्ञासा चाळवली जाते.

पुढचा प्रवास अधिक आनंददायी होतो, कारण तो सूर्यापासून त्याच्या कुटुंबकबिल्यापर्यंत जातो. सूर्य या चराचराच्या सृष्टीतील कर्ता पुरुष. भारतीय धर्मानी या सूर्याला साजेसा कुटुंबकबिला दिला. त्याचे आई-वडील, त्याच्या पत्नी, त्याची मुलं, त्याच्या सुना, त्याचे व्याही, एक ना दोन अनेक नातेवाईक घेऊन हा कुटुंबवत्सल सूर्यदेव पुराणकथांच्या कोंदणात जनमानसात रुजला. लेखिकेने त्याच्या या कुटुंबकबिल्यालाही योग्य मान दिला आहे. येथे दिलेला विवाह सूक्ताचा अनुवाद तर आपल्याला पुराकथांच्या एका वेगळ्या जगात मुशाफिरी करवून आणतो. विविध पुराकथा आणि त्यांचे लालित्यपूर्ण विश्लेषण हे तर या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.

सूर्याच्या जशा एकटय़ाच्या किंवा त्याच्या कुटुंबकबिल्याबरोबरच्या मूर्ती मिळतात तशा काही इतर देवतांबरोबरीच्या संयुक्त मूर्तीही पाहायला मिळतात. हरिहरपितामहार्क किंवा ब्रrोशानजनार्दनार्क अशा वैशिष्टय़पूर्ण मूर्ती संपूर्ण भारतभर पसरलेल्या आहेत. अशा मूर्तीना मूर्तिशास्त्रामध्ये ‘सिंक्रेटिक’ मूर्ती म्हणतात. या मूर्तीच्या शरीरावर सूर्याबरोबरच इतर देवतांचीही लांच्छनं (ओळखीच्या खुणा) असतात. हे भारतीय सूर्यमूर्तीचे एक वैशिष्टय़ मानावे लागेल. एकूणच सूर्याचे मूर्तरूप आणि संकल्पनेला विविध भारतीय संप्रदायांनी आपलेसे केले. शैव, शाक्त, वैष्णव, बौद्ध सर्वानीच सूर्याला सामावून घेतले. तंत्रमार्गीयांनीदेखील सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. या तत्त्वसमागमातूनच निर्माण झाल्या त्या संयुक्त प्रतिमा. हा अतिशय गुंतागुंतीचा जटिल विषय लेखिकेने इथे लीलया हाताळला आहे.

आज जरी मोठय़ा प्रमाणात सूर्य मंदिरे दिसत नसली तरी आपल्या दैनंदिन जीवनात विविध विधी कुलाचाराच्या माध्यमातून आपल्याला सूर्य भेटतो. रामदास स्वामींनी स्थापन केलेली रामाची चाफळ येथील मूर्ती खरे तर सूर्याची आहे. विविध श्लोक, स्तोत्रे, व्रते अशा अनेक माध्यमांतून आजही भारतात सूर्यपूजा केली जाते. लेखिकेने या पुस्तकात या साऱ्या परंपरांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा खरे तर आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न. हा एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकेल. परंतु एकूणच आजच्या भारतीय समाजातील, लोकमानसातील व्रत-विधी साहित्यातील सूर्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. रांगोळीमध्ये भेटणारा सूर्य, बारा महिन्यांत बारा आदित्यांच्या रूपात भेटणारा सूर्य, छटपूजा, सप्तमीची अनेक सूर्यव्रते, आदिवासींमध्ये बडादेव म्हणून येणाऱ्या सूर्याचे प्रस्थ, पोंगल, विशू, मकरसंक्रांत अशा अनेक सूर्यरूपांची आणि रूपकांची लेखिका ओळख करून देते.

भारतीय देवतांमध्ये सूर्य हा एकमेव देव आहे जो पायात जोडे घालतो. त्याचा पेहरावही फारसा देशी असत नाही. या त्याच्या मूर्तिवैशिष्टय़ांवर अनेक विद्वानांनी संशोधन आणि लेखन केले आहे. सूर्यपूजेचा पहिला मानही ‘मग’ ब्राह्मणांना दिला आहे. त्याचा संबंध श्रीकृष्णाचा नातू सांब याच्याशी जोडला गेला आहे. असे मानले जाते की मुळात सूर्याची मूर्तिपूजा ही भारतामध्ये बाहेरून आली. वेदातील सूर्य प्रतीकरूपातील होता. त्याला मूर्तिरूप दिले शकांनी. हे शक कोण? हा ‘शक-शकुन’ काय आहे? प्राचीन पíशयाच्या एका प्रांतातून हे शकांबरोबर सूर्याचे स्वरूप भारतात आले असावे. याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. लेखिकेने कोणत्याही पक्षपाताला बळी न पडता विविध उदाहरणे देत सूर्यप्रतिमेचा आणि सूर्यपूजेच्या या स्वरूपाचा ऐतिहासिक प्रवास विशद केला आहे.

‘सर्वसाक्षी’ हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्ण आहे. हा विषय हाताळताना बरेचदा तो क्लिष्ट होण्याची भीती असते. काय घ्यायचे आणि काय सोडायचे हेच नेमके कळत नाही आणि माहितीचा भडिमार किंवा केवळ कल्पनाविलास या दोन टोकाच्या भूमिकांमध्ये हरवून जायला होते. लेखिकेनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. पुस्तक एकाच वेळी ललित परंतु संशोधनात्मक आहे.

या पुस्तकामध्ये भारतातील तसेच भारताबाहेरील सूर्यमंदिरांची माहिती दिली आहे. या मंदिरांचा इतिहास, त्या संबंधित दस्तावेज, त्यांच्याशी संबंधित पुरातत्त्वीय अवशेष या साऱ्याचा ऊहापोह लेखिकेने केला आहे. भारताबाहेरील विविध धर्म आणि संस्कृतींमधील सूर्यसंकल्पना आणि त्यांच्या भौतिक अवशेषांवर लेखिकेने प्रकाश टाकला आहे. याचबरोबर पुस्तकाला जोडलेली टिपा आणि संदर्भग्रंथ सूचीची पुस्ती एका परिपक्व परिपूर्तीकडे घेऊन जाते.

‘सर्वसाक्षी’ या पुस्तकाची अनेक वैशिष्टय़े आहेत. या पुस्तकाची मांडणी विशेष आहे. खरे तर या पुस्तकाला ‘सौरकोश’ असेही म्हणता यईल. सूर्याच्या शोध घेण्यापासून सुरू झालेला प्रवास विविध टप्प्यांतून विश्वातील विविध देशांतील आणि संस्कृतीतील सूर्यसंकल्पनेपर्यंत घेऊन जातो. पानापानागणिक उत्कंठा वाढवणारे हे पुस्तक एक वैचारिक मेजवानी आहे. कोणत्याही पानावरून पुस्तक वाचायला सुरुवात केली तरीही तेवढाच आनंद मिळतो. लेखिका वाचकाला बरोबर घेऊन जाते. तिथे कुठेही आढय़ता, क्लिष्टता नाही. या लेखनामध्ये सहप्रवाशाचा मोकळेपणा आणि मार्गदर्शकाची प्रगल्भता एकाच वेळी आहे. सूर्याची समग्र माहिती विशद करणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक असावे.

या पुस्तकाची पृष्ठरचना आणि छपाई आधिक आकर्षक होऊ शकली असती, परंतु ग्रंथाली प्रकाशनने ज्या अल्प किमतीत हे वाचकांना उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे कदाचित ही तडजोड केली असावी. या पुस्तकात अनेक छायाचित्रे आहेत तीही अधिक आकर्षक पद्धतीने पेश होऊ शकली असती.

‘सर्वसाक्षी’ हे पुस्तक नुसतेच वाचनीयच नव्हे तर संग्रा आहे. लेखिकेने सूर्याच्या लौकिक आणि अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा आलेख उत्तम रेखाटला आहे. सूर्यावर लिहिणे हे कठीण कामच नव्हे तर एक आव्हान आहे. तो कधी प्रकट दिसतो तर कधी प्रतीकरूपाने आपले अस्तित्व दाखवतो. या साऱ्याचा मेळ घालत वाचकाला खिळवून ठेवणे अधिकच दुरापास्त, परंतु संजीवनी खेर यांनी हे उत्तमरीत्या साधले आहे. हे पुस्तक खऱ्या अर्थाने वाचकाला ‘सूर्य’ या मिथकातील अर्थ शोधण्याचा आनंद देते.
सर्वसाक्षी, संजीवनी खेर, प्रकाशक- ग्रंथाली, मूल्य- २५० रुपये, पृष्ठे –  १४४
सूरज पंडित – response.lokprabha@expressindia.com