‘मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास :  तंत्र, योग आणि भक्ती’ हा मध्ययुगीन काळाचे विविध आंतरप्रवाह समजून देणारा अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे डॉ. सुधाकर देशमुख यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या या ग्रंथाचा परिचय-

‘मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास :  तंत्र, योग आणि भक्ती’ हा डॉ. सुधाकर देशमुख यांनी लिहिलेला ग्रंथ वाचला. एका वेगळ्या व काहीशा अलक्षित विषयाला समर्पित असलेला हा ग्रंथ मध्ययुगीन इतिहासाचे विविध पैलू प्रथमच स्पष्ट करताना दिसतो. आजपर्यंत प्रामुख्याने या विषयावर डॉ. रायचौधरी, हरिप्रसाद द्विवेदी, एन. एन. भट्टाचार्य यांचे इंग्रजी व हिंदी ग्रंथ प्रमाण मानावे असे होते. मराठीतून प्रथमच एवढय़ा व्यापकपणे हा विषय स्पष्टपणे यशस्वीरीत्या मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. डॉ. देशमुख व्यवसायाने डॉक्टरच होते. एम. डी. विशेष तज्ज्ञ  डॉक्टरांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने गूढरंजनवादी असलेल्या एखाद्या विषयावर अधिकारवाणीने लिहिणं ही बाब आवर्जून नोंदवायला हवी. यापूर्वी स्थलइतिहास किंवा राष्ट्रवाद यांसारख्या विषयावर त्यांनी लिहिले होते. महाराष्ट्रात विचारवंतांची जी परंपरा विशेषत्वाने या क्षेत्रात लाभली त्यात स. रा. गाडगीळ, रा. चिं. ढेरे, ग. वा. तगारे, शरद पाटील या परंपरेत उल्लेख करावा असे त्यांचे हे काम आहे. एखाद्या विषयाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन व लेखनशैली नरहर कुरुंदकरांकडे होती, तीच परंपरा डॉ. देशमुख यांनी पुढे नेली.

national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Flight safety instructions given by Air India showing a glimpse of India's diverse culture Video Viral
भारतीय संस्कृतीची झलक दाखवत Air Indiaने सांगितल्या फ्लाईट सेफ्टी सुचना, Viral Video एकदी नक्की बघा

या पुस्तकात त्यांनी अत्यंत क्लिष्ट वाटावा असा विषय विविध अंगांनी स्पष्ट करताना विविधांगी मुद्देसूद विवेचन केले आहे. ग्रंथात आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, वैदिक-अवैदिक असे वर्गीकरण करणे हे योग्य वाटत असले तरी हे एकमेकातून निर्माण झाले आहे ही गोष्ट लक्षात येते व हाच विकासक्रम माझ्या लक्षात आला. ‘या क्षेत्रातील मान्यवरांच्या तथ्यांची मी फक्त पुनर्माडणी केली आहे.’ अभ्यासाच्या दृष्टीने मध्ययुगाचा कालखंड इ. स. ५०० ते १८०० असा त्यांनी मांडला आहे. भारतीय परंपरेच्या दृष्टीने वेदान्त विचार आणि वैदिक परंपरा हीच मुख्य धारा होती. त्या विरोधात बौद्ध, जैन हे धर्म व तंत्र हे साधनशास्त्र पर्याय म्हणून उभे राहिले. त्यांचा विचार वेदान्त विचारांच्या आणि मुख्यधारेच्या संदर्भातच करावा लागतो. आजही वेदान्त तत्त्वज्ञान व त्या परंपरेतील षड्दर्शनही तितकेच मोलाचे मानले जाते. आपल्या ग्रंथाची रचना करताना लेखकाने तंत्रापूर्वी शाक्त संप्रदाय, तंत्राचा विकास व पाश्र्वभूमी सुरतसाधना-कौलसाधना बौद्धतंत्र, नाथपंथ, पातंजल योग, हटयोग व उत्तरकालीन मध्ययुगीन भक्ती चळवळ, उदयविकास यांसारख्या टप्प्यात लेखन केले आहे. लेखकाला मध्ययुगीन काळातील तंत्रसाधना, तिचा उगम व विकास वैदिक परंपरेशी झालेला संपर्क यांसारख्या विषयाचे कुतूहल आहे. हा विषय समजावून घेऊन तो उलगडून दाखवावा, सुरतसाधनेविषयक तपशील स्पष्ट करावेत याविषयीची डॉक्टरांची जिज्ञासा त्यांच्या या पुस्तकातून दिसते. व्यापक संस्कारातून राष्ट्रवाद व समन्वयवादी विचारधारेतून विकसित झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व मध्ययुगीन साधनसंहितेला प्रमाण मानत नाही व हे उचितच आहे. यातूनच त्यांनी आजपर्यंतच्या आचार्यानी केलेल्या विचारमंथनाची चर्चा करत तंत्र वैदिक- अवैदिक त्यांची वैशिष्टय़े, उपासना पद्धतीचे विविध टप्पे, शवसाधना यांसारखे अत्यंत बारीकसारीक मुद्दे, तपशील चर्चेसाठी घेतले आहेत. चिनी परंपरेचा झालेला परिणाम, वाममार्ग ही विकृती आहे का, संभोग आणि समाधी यांसारख्या विषयाची त्यांनी पुस्तकातून चर्चा केली आहे. कुंडलिनी जागृती, योगसाधना या संबंधांतील तपशीलही त्यांनी नोंदविला आहे. उदाहरणच द्यायचे तर ध्यान, धारणा, समाधी या एकाच प्रकारच्या अनुभवाच्या पायऱ्या आहेत. १२ सेकंद मन एकाग्र करता आले तर ती धारणा. त्याच्या १२ पट म्हणजे १४४ सेकंद एकाग्र करता आले तर ध्यान आणि त्याच्या १२ पट म्हणजे तीस मिनिटे मन एकाग्र करता आले तर ती समाधी अवस्था होय.

भारतीय विचार परंपरेमध्ये विविध तत्त्वज्ञांचे असलेले योगदान त्यांनी पुस्तकातून अचूकपणे स्पष्ट केले आहे. शंकराचार्याच्या कामगिरीचे महत्त्वही ते तपशीलवार अधोरेखित करतात. कश्मिरी शिवाद्वैत, अभिनवगुप्त यांच्या विषयीचे तपशीलही नोंदवितात.

तंत्रसाधनेच्या क्षेत्रात झालेल्या संशोधनाचा त्यांनी पुस्तकातून तपशिलवार मागोवा घेतला आहे. मूळ साम्यवादी विचारांचा प्रभाव असलेला हा अभ्यासक प्रत्येक बाब तपशिलातून शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतो. वामाचारात मास, मद्य, मीन, मुद्रा आणि मैथुन या पंच ‘म’कार विषयीचे तपशील देत असतानाच ताओ या चिनी तत्त्वज्ञानाचा तंत्रमार्गावरील प्रभाव, तंत्रातील मैथुन योग, प्रसिद्धी आणि हटयोग यांवर चिनी ताओ विचारांची दाट छाया आहे, असेही ते स्पष्ट करतात. या विषयाचे विविध पैलू स्पष्ट करताना ते हेही नोंदवितात की, एकंदर वामाचार, कायासाधना आणि रसशास्त्र यांचे पूर्वाशेष आधीच्या काळात भारतीय वाङ्मयात हुडकणे शक्य असले तरी ते आचारविचार भारतीय मनाच्या वळणाचे (मूळ भारतीय तत्त्वज्ञानातील) नव्हते.

गोरखनाथांनी वामचारामुळे समाजात पसरलेल्या अनैतिकतेला आळा घालण्याकरिता कायासाधनेचा उपयोग केल्याने तिला म्हणजे कुंडलिनी योगाला महत्त्व प्राप्त झाले. एकूण वैदिक परंपरा, त्यातून वाढत जाणारे पुरोहितशाहीचे महत्त्व व अभिजनापासून काहीसा दुरावलेला सर्वसामान्य समाज हा तंत्र व नंतर नाथपंथाकडे सरकला. असे असले तरी मूळ भारतीय विचारांच्या प्रभावामुळे यातील अनाचाराला समाज मान्यता मिळाली नाही, हेही ते अधोरेखित करतात. सर्व नाथ सिद्ध हे समाजातील निम्नश्रेणीतील होते हे त्यांनी नोंदविले आहे.

मुळात तत्त्वज्ञानाची चर्चा करणारे हे लेखन असल्यामुळे ते एकदम समजून घेताना थोडे जड जाते. त्यातील विविध अंतप्रवाह स्पष्ट करण्याचा एक चांगला प्रयत्न मात्र लेखकाने केला आहे.

साधना ते तत्त्वज्ञान

तंत्र हे साधनाशास्त्र आहे. त्याला तत्त्वज्ञान नव्हते. कश्मिरी शैवातील शिवसूत्रे नवव्या शतकात लिहिली गेली आणि त्यानंतर झालेल्या आचार्यानी विशेषत: अभिनवगुप्तने त्यावर लिहिलेल्या टीकेमुळे शैव संप्रदायाच्या अद्वय तत्त्वज्ञानाचा प्रसार झाला. या तत्त्वज्ञानावर दिग्गजांच्या सौत्रान्तिक विज्ञानवादाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. आठव्या शतकात झालेल्या शंकराचार्यानी अद्वैत तत्त्वज्ञानाचे व्यवस्थीकरण केले. कदाचित त्यांच्या प्रभावाने काश्मिरी तत्त्वज्ञानात शैवसूत्रे लिहिली गेली असावी आणि सिद्धान्तांचे व्यवस्थीकरण सुरू झाले असावे. तंत्र हे साधनाशास्त्र होते. त्याला अभिनवगुप्तामुळेच आवश्यक तत्त्वज्ञान मिळाले. (पृष्ठ १०९)

नाथपंथाच्या योगदानाबाबत त्यांनी विविध तपशील नोंदविले आहे. सिद्धाचार्य समाजातील कनिष्ठ जातीतील श्रमजीवींना उदरनिर्वाहाचा आपला व्यवसाय सोडणे परवडणारे नव्हते. त्यांनी आपल्या व्यवसायातच अध्यात्म शोधले. आपल्या श्रमाला, व्यवसायाला आध्यात्मिक अर्थ दिला यांसारखे बारीकसारीक तपशील ते नोंदवितात.

नाथपंथ, दत्तसंप्रदाय, शैव, जैन या अशा विविध संप्रदायांचा त्यांनी विचार केला आहे. शंकराचार्याच्या संदर्भात ते नोंदवितात. बौद्ध व शैव संप्रदाय हे दोन्ही संप्रदाय वेदविरोधी असल्याने या दोन्हीही तत्त्वज्ञानाचे खंडन करणे शंकराचार्याना आवश्यक वाटले असावे. शंकराचार्याच्या या हल्ल्यानंतर फक्त जैन आणि वैशेषिक ही दोनच तत्त्वज्ञान टिकून राहू शकली, तर अभिनवगुप्तने आणि ज्ञानेश्वराचे ज्ञान, भक्ती व कर्म यांची सांगड घातली. तसेच अद्वैतही सांगितले. त्याचा पहिला आविष्कार महायान पंथात दिसून येतो. यांसारखी त्यांची मते निश्चित विचार करण्यासारखी आहे. याच संदर्भात ते पुढे लिहितात समाजनिषिद्ध अशा वामाचाराचे परिवर्तन योगमार्गात करून गोरखनाथांनी फार मोठे काम केले. बौद्ध, हिंदू, तंत्रमार्गी, कापालिक, कालमोघ, शैव, शाक्त, वैष्णव व अवैदिक अशा विविध संप्रदायाचे एकीकरण करण्याचा फार मोठा प्रयत्न गोरखनाथांनी केला. पण सामान्य लोकांना गोरखनाथ पुरस्कृत योगमार्ग (कुंडलिनी मार्ग) हा अवघड असल्याचे लवकरच लक्षात आले. ही कोंडी फोडण्यासाठी, सामान्य लोकांपर्यंत जाण्यासाठी भक्तीमार्ग हा उत्तम असल्याचे समाजधुरिणांच्या लक्षात आले. (पृष्ठ २८१)

शैव संप्रदायाच्या संदर्भात लेखकाने म्हटले आहे की, उपलब्ध पुराव्यावरून अभ्यासक कालमुख हेच वीरशैव झाले असावेत किंवा कालमुखांचेच परिवर्तन वीरशैवात झाले असावे असे मानता येते. उपसंहारात ते नोंदवितात, आजचा हिंदू धर्म हा वैदिक धर्म म्हणवला जात असला तरी तो वैदिक कमी आणि तांत्रिक अधिक आहे. आजच्या हिंदू धर्मातील ८४ टक्के भाग तांत्रिक परंपरेतील आहे. मध्ययुगाची विभागणी ते इ.स. ५०० ते १२०० हा पूर्वार्ध व इ. स. १२०० ते १८०० उत्तरार्ध अशी करतात व ती योग्यच आहे. एकूण मध्ययुगीन काळाचे विविध आंतरप्रवाह समजून घेण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक केलेले लेखन अशी या ग्रंथांची नोंद घ्यावी लागते. प्रत्येक युग आपल्याबरोबर काही मूल्य निर्माण करत असते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरवत असते ती मूल्ये त्या काळाची ओळख म्हणता येतील व त्याचाच युगधर्म म्हणता येईल.

प्रारंभिक काळाचा जो आढावा लेखकाने घेतला आहे तो तत्कालीन अभ्यासकांच्या नोंदीच्या आधारे घेतला आहे. असे असले तरी त्यांची सर्वच मते मान्य होतील असे नाही. उदा. आर्य संस्कृतीच्या संदर्भात एकाच वेळी मातृसप्ताक व पितृसत्ताक पद्धत त्यांच्यामध्ये रूढ होती किंवा एकूण या दोन आर्याची विश्वे निराळी होती. एक विश्ववैदिक होते तर दुसरे विश्व अवैदिक होते. (पृष्ठ २०) तसेच वाढत्या शहरीकरणाबरोबर येणाऱ्या बकालपणामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक स्थितीचा परिपाठ म्हणून बौद्ध जन्माला आला. (पृष्ठ २२)  तसेच पशूपूजकामधून जसे पशूपती या शिवाच्या संकल्पनेची निर्मिती झाली तसेच मृत पितरांच्या स्वरूपात शिवाला पाहिले गेले. (पृष्ट ४४) अर्थात ही नोंद आनुषंगिक नोंद आहे. एकूण लेखकाचा प्रयत्न एक वेगळी दिशा देणारा असून मुद्दाम अभ्यासला पाहिजे असा हा ग्रंथ आहे.

मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास – तंत्र, योग आणि भक्ती, डॉ. सुधाकर देशमुख, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, मार्च २०१३, मूल्य : ४०० रुपये, पृष्ठे : ३६८
डॉ. अरुणचंद्र पाठक – response.lokprabha@expressindia.com