‘द गर्ल फ्रॉम फॉरिन’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका सादिया शेपर्ड. लेखिकेच्या आजीची (नानाची) इच्छा असते की सादियाने त्यांच्या जन्मगावी जाऊन, तेथील घराला भेट देऊन त्यांच्या जमातीचा, पूर्वजांचा इतिहास समजून घ्यावा व त्या जीवनाचा परिचय करून घ्यावा. तिची आवडती आजी नाना ही जन्माने ज्यू, तिचे नाव रेयल जेकब्स.

इस्राइल सोडून निघालेल्या टोळ्यांपैकी एक जहाज दोन हजार वर्षांपूर्वी हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर आदळून फुटले होते. त्यातील वाचलेले लोक तेव्हापासून तिथेच स्थिरावले. जे नानाच्या पूर्वजांपैकी एक असतात. आजीची इच्छा पूर्ण करण्याचे सादिया तिला वचन देते. फुलब्राइट स्कॉलरशिपवर पुण्याच्या ‘नॅशनल फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मध्ये ज्युडाईझमचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेहून भारतात एकटी येते.

या शोधकार्यासाठी निघालेली सादिया प्रथम वरळी सीफेस भागातील तिच्या आजीच्या ‘राहत व्हिला’ नावाच्या घराला भेट देते. लगेच दुसऱ्या दिवशी आजीच्या ज्यू जमातीचा म्हणजेच बेने इस्राइल लोकांचा शोध घेण्यासाठी पुण्यात येते. त्या वेळी संशोधनासाठी तिच्याकडे निव्वळ एकावयस्कर नातेवाईकाचे आजीच्या डायरीतून घाईघाईने खरडलेले फोन नंबर्स आणि १९८० च्या सुमारास लिहिली गेलेली मानवजातीशास्त्रावरची पुस्तके एवढय़ा दोनच गोष्टी हातात असतात. पुण्यात नानाच्या बहिणीचा नवरा अंकल मोझेस आणि हैदराबादला भाऊ राहत असतो.

सादियाच्या कुटुंबाची धार्मिक पाश्र्वभूमी फार गुंतागुंतीची आहे. तिच्या आईची आई नाना ही जन्माने ज्यू, पण तिचे मुस्लिमाशी लग्न झालेले. तिने मुस्लीम धर्म स्वीकारलेला. सादियाची आई मुस्लीम, पण वडील ख्रिश्चन. त्यामुळे आपण नक्की कोणता धर्म स्वीकारावा, याचा सादियाला कायम संभ्रम.

सादिया भारतात येते त्यापूर्वी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर मुसलमान दहशतवाद्यांनी नुकताच हल्ला केलेला असतो. साहजिकच पुन्हा मुस्लीम धर्मीयांविरुद्ध समाजातील इतर धर्मीय लोकांमध्ये नाराजी व द्वेष निर्माण झालेला असतो. अशा पाश्र्वभूमीवर सादिया हे मुस्लीम नाव ऐकल्यावर पुण्यातील ज्यूंचे प्रार्थनास्थळ म्हणजेच ‘सिनगॉग’मध्ये सादियाचे म्हणावे तसे स्वागत होत नाही. पुण्यातील सिनगॉगला भेटण्यापेक्षा तिने मुंबईतील सिनगॉगमधील ज्यूंना भेटावे अशी सूचना अंकल मोझेस तिला देतात. मुंबईतील सर्व ज्यू इस्राइलला परत जात आहेत आणि तू हा खटाटोप कशासाठी करीत आहेस, असा नकारात्मक सूरही ते तिला ऐकवतात. तरीसुद्धा नानाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सादिया तिचे प्रयत्न नेटाने सुरू ठेवते.

मुंबईतील सिनगॉगला भेट देऊन काही माहिती मिळते का ते पाहते. त्याबरोबर भोपुरली आणि चोपडे या आजी-आजोबांच्या गावात जाऊनही शोध घेते. अमेरिकन ज्युईश जॉइंट कमिटी या १९६० पासून मुंबईत समाजकल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेला भेट देते. तेथील एक समाजसेविका कोकण किनाऱ्यावरच्या खेडय़ातून वसलेल्या तीनशे बेने इस्राइली कुटुंबीयांना नियमित जाऊन भेटत असते. तिच्याबरोबर सादियाही काही ज्यूंना भेटते. दरम्यान, कराचीतील तिच्या भावंडांच्या लग्नाला ती जाते तेव्हा तिथे तिला नानाच्या पूर्वायुष्याची बरीच माहिती मिळते.

एके काळी ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी चांगल्या वस्तीचा भाग असलेले ‘बाथ आयलंड या धनवंत लोकांमध्ये गणल्या जाणाऱ्या लोकवस्तीत सादियाच्या नानाचे ‘सिद्दिकी हाऊस’मधील घर असते. आजोबा मुस्लीम असल्यामुळे त्यांना नानाव्यतिरिक्त अजून दोन बायका. नाना सर्वात जास्त हुशार असल्यामुळे आपल्या पश्चात आपले सर्व कुटुंब एकत्र ठेवण्याचे ते नानाकडून वचन घेतात. आजोबा गेल्यावर असे लक्षात येते की, पूर्ण घर कर्जबाजारी झाले आहे. कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी नाना तिच्या नावचे राहत व्हिला विकून टाकते. त्याच्या मोबदल्यात सिद्दिकी हाऊसमधील एक फ्लॅट तिच्या नावावर केला जातो. त्या जागेत भाडेकरू असतो. तो जागा सोडत नाही, त्यामुळे नानाला त्या जागेचा काहीच उपभोग घेता येत नाही. तिचेच सावत्र मुलगे तिच्या घरातील सर्व वस्तू चोरून नेतात. बँक अकाऊंटमधील पैसे घेतात.  सादियाला प्रत्यक्ष भेटीत हे सर्व समजल्यावर ती खूप बेचैन होते.

दरम्यान, ‘अंकल मोझेस बरेच आजारी आहेत, तू त्यांना जाऊन भेट’ असे सादियाची आई तिला सांगते. सादिया त्यांना भेटून तिने संकलित केलेली माहिती व फोटो दाखवते. तेव्हा अंकल मोझेस तिला सांगतात की, तिचे पणजी-पणजोबा रेवदंडय़ाच्या सिनगॉगमध्ये जायचे. अर्थातच तिने जुळवलेले सारे तुकडे आणि हा संदर्भ यामुळे तिला पटते की नानाचे मूळ गाव म्हणजे रेवदंडा.

अशा प्रकारे अठरा महिने पुणे- मुंबई- रेवदंडा आणि इतर अनेक ठिकाणे भटकंती करीत, नानाच्या अस्तित्वाच्या खुणा शोधताना सादियाला कोणकोणत्या प्रसंगांना भावनिक पातळीवर तोंड द्यावे लागते आणि तरीही अतिशय चिकाटीने ती शोधमोहीम कशी पार पाडते, याची रंजक कहाणी म्हणजेच ‘विदेशी कन्या’ जरूर वाचावी अशी आहे.

विदेशी कन्या, मूळ लेखिका : सादिया शेपर्ड, अनुवाद : स्नेहलता दातार, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठ संख्या : ३६३, मूल्य :
३९०/-

रश्मी गोळे – response.lokprabha@expressindia.com