नावाप्रमाणेच ‘ब्रह्मांडाची कवाडं’ उघडणाऱ्या विज्ञानकथा रोजच्या कथांपेक्षा वेगळ्या आणि तितक्याच रोचक आहेत. केवळ वैज्ञानिक माहितींची पुस्तक वाचून कंटाळा आला असेल तर ‘ब्रह्मांडाची कवाडं’ उघडून त्यातील वैज्ञानिक कल्पनाशक्तीचा आस्वाद घेणे नक्कीच मनोरंजनात्मक ठरेल. विज्ञानकथा कथन करताना त्यात कुठेही कथेचा बाज ढासळू न देता वैज्ञानिक मूल्य पेरण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. कथाप्रकार व विषयांचे वैविध्य हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़. क्लोन या संकल्पनेचा नावीन्यपूर्ण आविष्कार आणि त्याने मानवी साखळीत होणारी उलथापालथ यातील काही कथांमघून उलगडण्यात आली आहे. हायबरनेशनचे तत्त्व एका वेगळ्या अंगाने उलगडण्यात आले असून त्याला रहस्य व रोमांचकतेची छटा आहे. भूतकाळाचा आणि भविष्याचा शोध घेणाऱ्या विज्ञानकथा, वास्तवाशी जवळीक साधणाऱ्या विज्ञानकथांमध्ये वाचक गुंतून पडतील हे नक्की. कालप्रवास आणि परग्रहवासी हे साय-फाय लेखकांचे जितके आवडते विषय तितकेच वाचकांच्याही जवळचे. मात्र या विषयांना एक नवीन ‘ट्विस्ट’देत वाचकांना खिळवून ठेवण्याची किमया लेखकांनी केली आहे. या कथा लिहणारे लेखक हे नवोदित असले तरी त्यांच्या कथांमधून तो नवखेपणा जाणवत नाही. या कथा या विज्ञानकथा असूनही कुठेही फक्त कल्पना विलास वाटत नाही. साहित्य आणि भाषेच्या निकषातून तावून सुलाखून निघालेल्या आहेत याची प्रचिती येते. पुस्तकाची सुरुवात होमवर्ड बाऊंड या कथेने होते. कॅप्टन सुनील सुळे यांची ही कथा विज्ञानिक आविष्कारासोबत मानवी मूल्यांचेही दर्शन घडवते. नंतर हळूहळू विज्ञानाची कवाडं विविध अंगाने उलगडत जातात. मराठी विज्ञानलेखकांच्या उद्याच्या पिढीचं प्रतिनिधत्व करणाऱ्या कथा व लेखक विज्ञानकथांच्या दालनाला अधिक समृद्ध करतील यात शंका नाही.
ब्रह्मांडाची कवाडं, संपादन : लक्ष्मण लोंढे, मेघश्री दळवी, प्रकाशक : गार्गीज प्रकाशन, पाने : २३२, किंमत : रु. २५०/-
response.lokprabha@expressindia.com