भारतातील मुस्लीम प्रश्नांवर काम करणारी जी काही माणसे स्वातंत्र्योत्तर काळात होऊन गेली, त्यातले आघाडीचे नाव म्हणजे हमीद दलवाई. कोल्हापूर येथील कोरगावकर ट्रस्टने त्यांना अभ्यास दौरा करण्यासाठी एक वर्षांची शिष्यवृत्ती दिली होती. त्यानुसार दलवाईंनी पूर्व पाकिस्तानच्या (बांगलादेश) व पश्चिम पाकिस्तानच्या सीमेजवळील भारतीय प्रदेशांत प्रवास केला. या प्रवासात त्यांनी विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधला. त्यावर आधारित एक लेखमालाही १९६८ मध्ये ‘मराठा’ दैनिकात प्रसिद्ध झाली. दलवाईंच्या मृत्यूनंतर ती लेखमाला ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या नावाने प्रकाशित झाली होती. या पुस्तिकेचे नुकतेच साधना प्रकाशनतर्फे पुनर्मुद्रण झाले आहे.

दलवाईंच्या विचार व कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आस्थेने दखल घेतली जात आहे. त्यांनी प्रा. अ. भि. शहा यांच्यासमवेत स्थापन केलेली ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’, त्यानंतर दोनच वर्षांनी (१९७०) स्थापन केलेले ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ असो, किंवा मुस्लीम सुधारणांसाठी केलेले प्रयत्न असोत, या सर्वासाठी एक अनुभवाधिष्ठित बठक असणे आवश्यक होते. ती बठक त्यांना या प्रवासाने दिली.  या पुस्तिकेतील दहा लेखांमधून साठच्या दशकांतील अनेक सामान्य लोक, कार्यकत्रे व बुद्धिवंत आपल्याला भेटतात. या व्यक्तींचे मन, विचार आणि ती कळत-नकळत जगत असलेल्या विसंगतीपूर्ण जीवनाचे दर्शन आपल्याला होते. फाळणीनंतर बदललेले वातावरण, धर्मनिरपेक्ष लोकशाही भारताचा पहाटकाळ, त्याच दरम्यान पाकिस्तानशी झालेले १९६५ चे युद्ध, अशा संक्रमणकाळातील मुस्लीम मनाचा वेध दलवाईंनी यात घेतला आहे.

पहिल्याच प्रकरणात त्यांनी मुस्लीम समाजातील विसंगतींवर बोट ठेवले आहे. श्रीनगरच्या एका हॉटेलात भेटलेल्या मुस्लीम कर्मचाऱ्याला भारतात सुस्थिती असली तरी इस्लामचे अधिक आकर्षण वाटते. हाजीपीरच्या खिंडीत भारतीय सन्याला रसद पुरवणारे हमाल आणि त्यांचे अगतिक जीवन, मुरादाबादचा मुस्लीम गृहस्थ पाकिस्तानला मायभूमी मानत असूनही िहदू जातीव्यवस्थेचे समर्थन करतो, रत्नागिरीच्या खेडय़ात मुस्लीम लीगची स्थापना करताना तिथले मुस्लीम गावातील िहदू देवाला नारळ अर्पण करतात, असे अनुभव नोंदवत दलवाई मुस्लीम समाजातील विसंगती आपल्यासमोर आणतात.

फाळणीला भारतीय मुस्लिमांचा आंधळा पाठिंबा मिळण्यामागे कोणती प्रेरणा होती, किंवा मुस्लीम समाज विशेषत: मुस्लीम बुद्धिजीवी वर्ग भूगोलाच्या मर्यादा कसा विसरला, या प्रश्नांची उत्तरे दलवाई या प्रवासात शोधू पाहतात. स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकांत मुस्लिमांची एक नवी पिढी उदयाला आल्यानंतर मुस्लीम जातीयवादाला खतपाणी घालणारी परिस्थिती देशात राहिली नव्हती. अशा वेळी भारतीय समाजात एकात्म होऊ पाहणाऱ्या प्रवृत्ती नव्या पिढीत आहेत का याचा वेध घेण्याचा ते सजग प्रयत्न करतात. कोलकात्यातील चित्रपट वितरक खानबहाद्दूर डोसानी, उर्दू दैनिक चालवणारे आणि बोहरा समाजात नवमतवादाचा पुरस्कार करणारे टी. एम. जरीफ, किंवा कोलकाता विद्यापीठातील पर्शियन भाषाप्रमुख प्रा. हिरालाल चोप्रा अशा काहींबरोबर त्यांनी संवाद साधला. परंतु बदललेल्या परिस्थितीची जाणीव त्यांना झाली नसल्याचे निरीक्षण दलवाई नोंदवतात. कोलकात्यातील ‘कॅम्पस’ या बंगाली साप्ताहिकाच्या पन्नालाल दासगुप्ता यांच्याशी त्यांचा परिचय होतो. या साप्तहिकातर्फे नलीन सरकार यांना तत्कालीन पूर्व पाकिस्तानात सुरू असलेल्या दंग्यांची माहिती मिळवण्यासाठी गुप्तपणे पाठविण्यात आले होते. त्यांनी मिळवलेल्या माहितीतून बरीच नवी माहिती त्या वेळी प्रकाशात आली होती. तेव्हा पूर्व पाकिस्तानाततील घडामोडी म्हणजे बदलाची नांदी असल्याचा समज बंगालमधील या िहदू बुद्धिजीवी वर्गाने करून घेतला असल्याचे मत दलवाई व्यक्त करतात.  याच दरम्यान त्यांची भेट तेथील अयुब आणि मत्रेयीदेवी या दाम्पत्याशी होते. त्यांच्या आंतरधर्मीय विवाहामुळे उठलेल्या वादंगाचे आणि त्याचा या दोघांच्या सहजीवनावर झालेला परिणामाचे कथन मत्रेयीदेवी करतात. अशीच भेट ‘स्टेट्समन’ या दैनिकाचे आसामामधील विशेष प्रतिनिधी हमदी बे यांची. भारतीय सीमा प्रदेशात बेकायदा घुसलेल्या दोन ते तीन लाख पाकिस्तानींची माहिती त्यांनी १९६९ च्या जनगणनेचा अभ्यास करून प्रथम उजेडात आणली होती.  या प्रश्नाची धग त्यांच्यासमवेतच्या चच्रेतून जाणवते. मौ. तय्यबुल्ला यांच्या कुटुंबीयांशी झालेल्या संवादातून आसामामधील आसामी-बिगरआसामी मुस्लिमामधील मानसिक तणावाचे दर्शन दलवाई घडवतात.

जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचे हे पुस्तक आजही कालबाह्य़ वाटत नाही. त्याचे कारण िहदू-मुस्लीम प्रश्न असो किंवा मुस्लीम धर्मातील अंतर्गत सुधारणांचा प्रश्न असो, त्यातील आव्हाने आजही तशीच आहेत. वास्तव समजून न घेता प्रश्नाला भिडण्याची(?) राजकीय शक्तींची सनातन सवय, आणि त्याला सामान्यजनांचा व बुद्धिजीवींचा प्रतिसाद यातील अंतर्वरिोधही तसाच आहे. विवेकी आणि विज्ञानवादी मुस्लीम समाज घडवण्याचे, त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न पाहून दलवाईंनी त्यासाठी भरीव योगदान दिले. त्याची पूर्वतयारी त्यांनी कशी केली हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचावे असे आहे.

इस्लामचे भारतीय चित्र, लेखक – हमीद दलवाई, प्रकाशक – साधना प्रकाशन, पृष्ठे – ६८, मूल्य – ५० रुपये

प्रसाद हावळे – response.lokprabha@expressindia.com