ही गोष्ट आहे तीन ब्रिटिश मुलींची. त्यांच्याभोवती गुंफल्या गेलेल्या नातेसंबंधांची. एक माणूस आणि त्याच्याभोवतीचं जग, त्याचं अनुभवविश्व, त्याचं आयुष्य ही एक कादंबरी असते असं मानलं तर तीन मुली आणि त्यांचं आयुष्य असं सगळं मिळून किती गुंतागुंतीचं, नाटय़मय असू शकेल याची कल्पना करता येते. त्यातही या तीन मुली स्वत:च्या आयुष्याचा शोध घेत स्वातंत्र्यपूर्व भारतात आलेल्या असतील तर.. हाच सगळा पट मांडला आहे, ईस्ट ऑफ द सन या ज्युलिया ग्रेसगन यांच्या पुस्तकात. श्यामल कुलकर्णी यांनी उगवतीच्या दिशेने त्याचा सुंदर अनुवाद केला आहे. सुरुवात करताक्षणी आपल्याला खिळवून ठेवणारं हे पुस्तक शेवटपर्यंत आपली उत्कंठा वाढवत नेतं. त्याला असलेली वसाहतकालीन भारताची, भारतीय स्वातंत्र्यलढय़ाची पाश्र्वभूमी आपल्याला या पुस्तकापासून जराही बाजूला होऊ देत नाही. तीन मैत्रिणींचं निखळ विश्व मांडणारं हे पुस्तक आपल्याला शांता शेळके अनुवादित चौघीजणी (लिट्ल विमेन) या पुस्तकाची आठवण करून देत राहतं.

ही कहाणी आहे विवा, रोझ आणि टॉर या तीन मुलींची. विशीच्या आतल्या रोझ आणि टॉर एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत. विवाची आणि त्यांची ओळखही नाही. पण एकाच बोटीतून त्या तिघीजणी भारतात यायला निघतात आणि त्यांची एकमेकींशी ओळख होते. सुरुवातीला एकमेकींच्या जवळ जायला फारशा उत्सुक नसलेल्या या मुली बोटीवरून उतरेपर्यंत, म्हणजे भारतात पोहोचेपर्यंत एकमेकींच्या छान मैत्रिणी होतात. नंतरही या ना त्या कारणाने भेटत राहतात आणि त्यांचे एकमेकींशी जिव्हाळ्याचे बंध जुळतात. त्या सगळ्या नातेसंबंधांचा तरल आलेख हे पुस्तक मांडतं. भारतात येणारा तत्कालीन ब्रिटिश समाज, त्यांचं जगणं, तत्कालीन भारतीय समाज या दोन्ही समूहांचे एकमेकांशी असलेले लागेबांधे, ताणेबाणे, स्वातंत्र्यपूर्व काळाची ती धगधग ही सगळी पाश्र्वभूमी या कादंबरीला आहे.

१९२८ साली लंडनमधील ‘लेडी’ नावाच्या एका मासिकात आलेल्या जाहिरातीपासून ही कादंबरी सुरू होते. विवा होलावे या अठ्ठाविशीच्या तरुणीने कुणाला भारतात आपल्या मुलांना पाठवायचं असेल तर मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी आपण आया म्हणून उपलब्ध आहोत अशी जाहिरात दिलेली असते. या जाहिरातीवरूनच आपल्याला त्या काळात काय चालत असणार याची कल्पना येते आणि पुढे पुढे ती वृद्धिंगत होत जाते. भारतात नोकरीसाठी येणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची मुलं सुट्टीसाठी किंवा सुट्टी संपवून भारतात जात असतं. त्यांना सोबत म्हणून जाण्याचं काम त्या काळी मिळत असे. विवा होलावेला भारतात जायचं असतं ते भारतात मरण पावलेल्या तिच्या आई-वडिलांची एक ट्रंक मसुरीला जाऊन परत घेण्यासाठी. त्या ट्रंकमध्ये आपल्यासाठी घबाड नाही, आणि त्यात जे असेल ते आता खराब झालं असेल हे तिला माहीत आहे, पण तरीही गेली अनेक वर्षे ती मसुरीला जायचं नियोजन करते आहे. आई-वडील-बहीण यांच्या मृत्यूनंतर ती एकटी वाढली आहे. एकटेपणाच्या अपरिहार्यतेतून एक अपयशी प्रेमप्रकरणही तिच्या खाती जमा आहे. त्यामुळे अविश्वास, सावधपणा, भूतकाळाची भेट म्हणून मिळालेला अस्वस्थपणा या सगळ्यासह ही विवा गाय नावाच्या सोळा वर्षांच्या मुलाची आया किंवा सोबतीण म्हणून भारतात यायला निघते. लेखिका व्हायचं हे तिचं स्वप्न आणि जगण्यासाठी सतत पैसे मिळवण्याची सक्ती या कात्रीत ती अडकलेली आहे.

ती ज्याची सोबतीण म्हणून निघाली आहे, तो सोळा वर्षांचा गाय हा मुलगा कुणालाच नको आहे. अतिशय अस्वस्थ, घुसमटलेलं बालपण वाटय़ाला आलेला हा मुलगा शाळेत रँगिंगला बळी पडला आहे. तिथून त्याला नाकारलं गेलंय. भारतात असलेल्या आई-वडिलांकडे त्याला पाठवलं जातंय. पण त्यांनाही तो खरं तर नकोच आहे. तो बोटीवर विचित्र वागून, विचित्र परिस्थिती ओढवून घेतो. विवालाही अडचणीत आणतो. पण नंतर तिच्यात आणि त्याच्यात एक समृद्ध नातं तयार होतं. असं असलं तरी पौगंडावस्थेतल्या या मुलाची फरफट आपल्याला अस्वस्थ करत राहते.

रोझ आणि टॉर या दोन मैत्रिणी भारतात यायला निघाल्या आहेत, त्या रोझच्या लग्नासाठी. भारतात ब्रिटिश सैन्यात काम करणाऱ्या जॅकशी रोझ लग्न करणार आहे. जॅक सुनीता नावाच्या एका सुंदर भारतीय मुलीत गुंतलेला आहे. त्या काळात इंग्लंडमध्ये लग्न जमत नसे अशा उपवर मुलींना त्यांचे आई-वडील भारतात आलेल्या तरुणावर गळ टाकण्यासाठी भारतात पाठवून देत. रोझने जॅकशी आधीच जमवलंय. पण तिचे आई-वडील तिच्या लग्नाला येऊ शकणार नाहीयेत म्हणून टॉर ही तिची जिवलग मैत्रीण करवली म्हणून तिच्यासोबत आली आहे. भारतातच असलेली तिची एक नातेवाईक स्त्री हे लग्न लावून देणार आहे.

टॉर ही एक टिपिकल बायकीपणाने वागण्याचा तिरस्कार करणारी, आपल्याला हवं तसं वागणारी बिनधास्त, पण गोड मुलगी आहे. प्रेमप्रकरणात सतत अपयशी होणारी टॉर पुन्हा तितक्याच उत्कटतेने प्रेमात पडत राहते. बोटीवर ती फ्रँक या डॉक्टरच्या प्रेमात पडते. पण फ्रँक विवामध्ये गुंतत जातो आणि स्वत:च्या स्वाभिमानाची, स्वच्छंदी जगण्याची आस असलेली विवा त्याच्यात गुंतूनही त्याला झिडकारत राहते.

भारतात उतरल्यानंतरचं या सगळ्यांचं जगणं, भारतात त्यांना येणारे वेगवेगळे अनुभव, त्यांचं हळूहळू बदलत गेलेलं आयुष्य आणि ते एकमेकींशी शेअर करण्याची त्यांची आच या सगळ्यातून ही कादंबरी एक विलोभनीय दुनिया आपल्यासमोर उभी करते. एरवी आपण तत्कालीन ब्रिटिशांकडे राज्यकर्ते या एकाच नजरेने पाहतो पण या राज्यकर्त्यां वर्गातले वेगवेगळे थर, त्यांचे प्रश्न, त्यांचं जगणं हे  सगळं कसं होतं ते या कादंबरीमुळे आपल्याला काचेच्या त्या बाजूकडून समजतं.

उगवतीच्या दिशेला, लेखक : ज्युलिया ग्रेगसन, नुवाद : श्यामल कुलकर्णी, प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस; मूल्य : रु. ५५०/-, पृष्ठे :  ६०४