पुस्तक वाचायला म्हणून घेतलं आणि काही कोडी पडली. ही कोडी घातली लेखकाच्या नावानं, मुखपृष्ठावरील चित्रानं आणि अर्थातच शीर्षकानंही.. सामान्यपणे आपण सगळेच पुस्तक वाचायला घेतलं की, हे तिन्ही घटक आणि मलपृष्ठ यांची संगती लावतो. काहींना तर मध्येच कोणतंही प्रकरण काढून ते झरझर वाचून काढून काहीएका निष्कर्षांवर येतात. त्यांना आपला सलामच. पण आपण पडलो साधीसुधी माणसं. सगळं पुस्तक वाचून झाल्याशिवाय फारसं बोलत नाही. अगदीच कुणी वाचनात आडकाठी आणतंय असं दिसलं तर ‘एका बठकीत वाचून काढायचंय’, एवढं सुनावून पुढचा परिच्छेद वाचायला घेतो. अशा साध्यासुध्यापणे प्रतििबब एखाद्या पुस्तकात पडलं असेल, तर मग ते वाचायला पुरतात केवळ काही तास. पण पदरी बरंच काही पडतं. शंकर कृष्णाजी देसाई लिखित ‘उलांडी’ हे पुस्तक याच यादीत मोडतं.

चित्रकर्ती स्वप्नजा देसाई अहेर यांच्या किनाऱ्यावरल्या होडीशी दोस्ती होऊन आपण पान उलटू लागतो. शीर्षकातच हा एका कलाकाराचा चित्रप्रवास असणार आहे, याची ही साक्ष असते. एरवी पुस्तकांच्या जगात रुक्ष भासणाऱ्या आतल्या पानांवर चार चित्रकरांचा चित्रसहभाग आपल्याला अचंबित करतो. कारण अजूनही चित्रांची पुस्तकं मुलांसाठी आणि काही मोठय़ा चित्रकारांची पुस्तक कलाप्रेमी गटात मोडणाऱ्या वाचकांसाठी असतात, अशी आपली समजूत असते. असो. मग दिसते अर्पणपत्रिका. एरवी दोन-चार ओळींत संपणाऱ्या अर्पणपत्रिकेपेक्षा ही निराळी आहे. लेखकाची आई, त्यांचा दादा आणि मोठय़ा बहिणी या त्याला दैवतासमान असणाऱ्या घरातील ज्येष्ठांना हे पुस्तक अíपलेलं दिसतं. सोबत आहेत, त्यांची रेखाचित्रंही. लेखक कुटुंबवत्सल असणार, अशी एक खूणगाठ मनाशी बांधली जाते.

यशवंत सरदेसाई यांच्या प्रस्तावनेवरून चित्रकार देसाई यांच्या जीवनाची एक धावती झलक आपल्याला दिसते आणि सुरू होतो त्यांचा जीवनप्रवास. आकर्षक शीर्षकं, सुंदर रेखाचित्रं आणि एक ते दोन पानी असणाऱ्या छोटेखानी आठवणींचा हा प्रवास.. देसाई यांनी कोकणाला आपलंसं मानलेलं दिसतं. कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक लहानमोठय़ा होडय़ा बांधलेल्या असतात. होडीचा तोल जाऊ नये, म्हणून एक वजनानं हलका ओंडका जोडतात, त्याला ‘उलांडी’ म्हणतात. देसाई यांच्या आयुष्यात ही ‘उलांडी’ची भूमिका त्यांच्या दादांनी, थोरल्या बहिणीनं निभावली, असं ते आवर्जून लिहितात. अंधेरी पूर्वेला असणाऱ्या मोरजकरवाडीतील बालपण देसाई आपल्याला सांगतात. त्यांनी रेखाटलेला माड अजूनही तिथं उभा आहे. तिसरीत असतानाच त्यांनी चित्रकलेत प्रावीण्य संपादन केलं होतं. घरची परिस्थिती हलाखीची असूनही कौतुकानं त्यांचा चित्रकलेचा छंद जोपासला गेला होता. शाहू मोडक, शांता आपटे या तत्कालीन कलाकारांबद्दल आणि वाडीतील माणसांबद्दल देसाई तितक्याच आत्मीयतेनं लिहितात. त्यांच्या घरचा गणेशोत्सव, शेजारचा दामू, शाळेतली चित्रकलेची पज, आदी गोष्टी त्या काळातल्या जीवनमानाची खूण पटवतात. शिकतानाच ते दुकानांच्या पाटय़ा रंगवणं, शाळेतले तक्ते आखणं वगरे छोटी कामं करत ते धर्मयुग अंकासाठी इलस्ट्रेशन करू लागले. दरम्यान मराठी मासिकं आणि पुस्तकांसाठीही ते काम करू लागले. साहित्यिक वर्तुळाप्रमाणेच त्यांची चित्रकला त्यांना चित्रपटाच्या विश्वातही घेऊन गेली. चित्रकार एम. आर. आचरेकर, चित्रकार केतकर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. काम शिकताना चांगल्याप्रमाणेच वाईट अनुभवही पदरी आले. पण त्याबद्दल खंत अथवा राग न दर्शवता आपल्या मार्गानं पुढंपुढं जात राहायचा वसा देसाई यांनी अंगी बाणवलेला दिसतो. त्यानंतर येतात त्या कलकत्त्यातील नोकरीचे अनुभव, नानावटींसाठी केलेल्या कामाचा बोलबाला, माहीमचा दर्गा, जी. डी. आर्टच्या पदवीनंतरची स्ट्रोनॅक्स अ‍ॅडव्हर्टायिझगमधली नोकरी अशा आठवणींचा ओघ येतो.

व्यावसायिक कलाकार म्हणून नाव व्हायला लागल्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. जाहिराती करणं, कंपन्यांचे लोगो बनवणं, स्टॉलचं डिझाइन करणं, बॅनर्स आणि पाटय़ा बनवणं अशी कामं त्यांनी केली. त्यांच्या अनोख्या चित्रकौशल्यामुळं कामाला तोटा नव्हता. कामाचा विस्तार होऊन उद्योग वसाहतीत त्यांचे तीन गाळे झाले. पण भागीदारीतील कुरबुरींमुळं हा व्यवसाय थांबवावा लागला. त्यांचं फारच नुकसान झालं. दरम्यान त्यांना महानगरपालिकेच्या चित्ररथाचं काम मिळालं आणि त्यांच्या चित्ररथाला पहिला पुरस्कार मिळाला. त्यानंतर दरवर्षी त्यांच्या चित्ररथाला पुरस्कार मिळत असे. मात्र या चित्ररथांच्या कामाच्या व्यापामुळं निखळ कलेकडं त्यांचं थोडं दुर्लक्ष झालं, हेही ते प्राजंळपणे सांगतात. ही खंत दूर सारून ते पुन्हा कलेकडे वळले.

वास्तववादी चित्रशैलीतले नावाजलेले कलाकार अशी त्यांची ओळख आजघडीला झाली आहे. विविध माध्यमांचा सारख्याच कौशल्यानं ते वापर करू शकतात. त्यांच्या चित्रांची विविध प्रदर्शनं भरली होती. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर मोनोरेल्वेच्या मार्गावर त्यांची दोन म्युरल्स झळकली आहेत. रसिकांच्या डोळ्यांत ती पटकन भरतात. पुस्तकात त्यांच्या जलरंग, तलरंगातील वेगवेगळ्या शैलीतील मोजकीच चित्रं आणि फायबर म्युरलचा फोटो देण्यात आला आहे. मात्र त्यांच्या आणखी काही रंगीत चित्रांचा समावेशही पुस्तकात करता आला असता, तर ते अधिक चांगलं ठरलं असतं. देसाई हे केवळ एक कलाकार नव्हे तर ते उत्तम लोकसंग्राहक आहेत. पुस्तकात त्यांनी रेखाटलेल्या शब्दचित्रांवरून ते सहजपणे ओळखता येतं. आज सत्तरीच्या घरातल्या देसाईंचा लोकसंग्रह अजूनही वाढतोच आहे. त्यांच्याबद्दल ते भरभरून बोलतात. कधी कुण्या बडय़ा व्यक्तींशी ओळख झाल्यावर चार जणांप्रमाणे आपलं काही मागणं मागावं, हे त्यांच्या स्वभावात बसत नाही. ते ते कधीच बोलून दाखवत नाहीत. वयोपरत्वे येणारी आजारपणं, औषधपाण्यामुळं तेही चार म्हाताऱ्या माणसांसारखे वैतागले आहेत. पण केवळ चिडचिड न करता श्वान वंशावळीवर चित्रं तयार करून ती प्रकाशित करण्याचा मानस ते व्यक्त करतात.
उलांडी, शंकर कृष्णाजी देसाई, प्रकाशक : उद्वेली बुक्स  पाने : १२०, किंमत : रु. २००/-
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com