[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरातला मूड आज जरा वेगळाच होता. नेहमीचं हसरं खेळतं वातावरण कुठेतरी गायब झालं होतं. वातावरणातला तणाव जाणवत होता. वंदनाला आज कुठे बाहेर जायचं नव्हतं, म्हणून ती घरीच होती, पण संजना घरी आल्यापासून तिचं काहीतरी बिनसल्याचं जाणवत होतं. वंदना बोलायला गेली नाही, कारण अशा तणावाच्या प्रसंगी बाबाला पुढे करायचं, हे तंत्र तिला गेल्या काही वर्षांत अवगत झालं होतं. बाबानं मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला. संजनाच्या खोलीत जाऊन तो तिच्याशी नक्की काय बोलला, हे वंदनाला कळलंच नाही. तू आम्हाला काही विचारायचं नाहीस, हे त्यानं तडजोडीच्या आधीच बजावलं होतं आणि अनिवार इच्छा होऊनही तिला या कराराचा भंग करायचा नव्हता. कारण ब्रह्मास्त्र एकदाच वापरण्याची संधी असते, याची तिला कल्पना होती. बराच वेळ वाटाघाटी झाल्यानंतर काहीतरी तोडगा दृष्टिपथात आल्याचं जाणवलं. “आता अकरावीत जायला लागलीस, तरी घरात काही मदत करत नाहीस. आई एकटीच मरमर मरते, याचं तुला काहीच देणंघेणं नाही,` हे वाक्य संजनाला जरा लागलं होतं. त्यापेक्षाही `दिवसभर व्हॉटस अप, फेसबुक आणि तुझ्या फ्रेंड सर्कलमध्येच असतेस,` हे जास्त जिव्हारी लागलं होतं, हेही तिला हळूहळू समजलं. याच्यावर तोडगा काय आणि कसा निघणार, याची तिला उत्सुकता होती. तो दृष्टिपथात आला. वंदनाला काही वेळ बेडरूममध्ये टीव्ही बघत बसायला सांगून संजना तिच्या बाबांबरोबर किचनमध्ये घुसली. रागावून का होईना, पोरीनं घरकाम मनावर घेतलं, या कल्पनेनंच वंदना खूश झाली होती. थोड्यावेळानं किचनमधून खमंग वास सुटला आणि वंदना न राहवून किचनकडे धावलीच. दोघांनी मिळून घरात चक्क कच्छी दाबेली केली, याचा तिला प्रचंड आनंद झाला. तिघांनीही त्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. वंदनाने संजनाला मिठी मारून तिचं कौतुक केलं, जरा जास्त बोलल्याबद्दल वाईटही वाटल्याचं सांगितलं. संजनानं तिला `जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी` छाप लूक दिला. “पुढच्यावेळी ह्या समोरच्या गाडीवाल्याकडूनच आणत जाऊ आपण कच्छी दाबेली. त्या अलीकडच्या चौकातल्यापेक्षा ही जास्त टेस्टी आहे!“ एका बेसावध क्षणी बाबा बोलून गेला आणि पुढच्याच क्षणी दोघांनी तिथून पळ काढला.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make kutchi dabeli maharashtrian recipes
First published on: 10-01-2017 at 01:15 IST