[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

`जिभेला जे चांगलं लागतं, ते शरीरासाठी अजिबात चांगलं नसतं. त्यामुळे तुम्ही जिभेचे चोचले अजिबात पुरवू नका!` असा सल्ला शैलाला तिच्या नव्या आयुर्वेदाचार्यांनी दिल्यापासून ती जरा बिथरलीच होती. जगात कारलं, लाल भोपळा, दोडका, तोंडली, एवढ्याच भाज्या अस्तित्त्वात आहेत, असं तिचं ठाम मत झालं होतं. त्यातून, या भाज्या पारंपरिक पद्धतीने न करता, त्यांच्यावर रोज वेगळे अत्याचार करण्याचा तिनं चंगच बांधला होता. कारल्याची कोशिंबीर, भोपळा रायता, तोंडलीची चटणी, दोडक्याची शिकरण, असे एकेक भयानक खाद्यपदार्थ तिच्या तथाकथित पाककौशल्यातून साकार होत होते आणि घरातल्या सगळ्यांची उपासमार सुरू होती. बरं, शैला तिच्या गुरूंच्या बाबतीत अगदी संवेदनशील होती. काश्मीर प्रश्नावरून एखादा पेटून उठणार नाही, एवढी ती गुरूंबद्दल एकही अपशब्द निघाला तर पेटून उठत होती. पतिराजांना तर लग्नापासूनच तिची भीती वाटत होती, पण एवढे दिवस कधी आयशीस न घाबरणारी मुलं आता `आयसिस`एवढीच तिला घाबरू लागली होती. शैलाचा हा पाक-दहशतवाद दिवसेंदिवस वाढत चालला होता. बरं, तिची नजर चुकवूनही काही खाणं शक्य नव्हतं, कारण तसं सांगून पोट भरल्याची कारणं दिली, तरी घरी आल्यावर तिनं केलेल्या पाक-अत्याचारांपासून सुटका नव्हती. काय करावं हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत होता. तिच्या या वेडापासून सुटकेची सगळ्यांनाच आस होती. शेवटी एके दिवशी वडिलांनीच हिंमत गोळा केली आणि ती आयुर्वेदाचार्यांकडेच अनुग्रहासाठी गेलेली असताना घरी सोयाबीन वड्यांचा घाट घातला. घरी आल्यावर ती खमंग वास पाहून घर डोक्यावर घेईल, अशी अपेक्षा होती, पण आज तिचा पवित्रा सौम्य झाला होता. तिनंही ते सोयाबीन वडे आनंदानं चापले. पौष्टिक आणि चविष्ट, असा संगम त्यात झाल्याचं कबूल केलं. तिच्या अचानक हृदयपरिवर्तनाचं रहस्य थोडं उशिरानं लक्षात आलं. स्वतः आयुर्वेदाचार्यांना तिनं कांदाभजी खाताना पाहिलं होतं, त्यामुळे आता त्यांची पायरी चढायची नाही, असं तिनं ठरवून टाकलं होतं. त्याचबरोबर दुसऱ्या गुरूच्या शोधात असल्याचंही जाहीर केलं, तेव्हा मात्र, सगळ्यांच्या तोंडाची चव पुन्हा उतरली!

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make soyabean vade maharashtrian recipes
First published on: 17-01-2017 at 01:15 IST